Adani Group Stocks: अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांमधील ३ कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी टोटल गॅस चे शेअर्स २९ नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात १४ टक्क्यांपर्यंत वधारले. गेल्या तीन दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी असली तरी या तिघांबद्दल बोलायचं झालं तर आजपासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) सेगमेंटमध्ये त्यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी आणखी वेग पकडलाय.
एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी यावर प्रतिक्रिया दिली. अल्गोरिदमच्या आधारे एफ अँड ओ सेगमेंटमध्ये शेअर्स जोडले जातात. जेव्हा शेअर्स ट्रेडिंग वॉल्यूममध्ये वाढलेली लिक्विडिटी दर्शवितात आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटसाठी पात्र ठरण्यासाठी योग्य होतात, तेव्हा त्यांना यात जोडलं जातं, असं ते म्हणाले.
अदानी ग्रीननं केलं मालामाल
आज अदानी ग्रीन ११४९ रुपयांवर उघडला आणि १२४७.३० रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर गेला आणि सकाळी १०.३० च्या सुमारास कंपनीचा शेअर १३.२३% च्या वाढीसह १२३१ रुपयांवर व्यवहार करत होता.
अदानी एनर्जी सोल्युशन, एटीजीएलमध्ये तेजी
अदानी एनर्जी सोल्युशननेही आज ७४८ रुपयांवर उघडल्यानंतर ८२४.७० रुपयांच्या दिवसातील उच्चांकी पातळी गाठली आणि १०.३० च्या सुमारास १२.२० टक्क्यांनी वधारून ८१६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. तर, अदानी टोटल गॅस ८०९.४० रुपयांवर खुला झाला आणि ८६२ रुपयांवर पोहोचला. सकाळी १०.३० वाजता तो ३.५८ टक्क्यांच्या वाढीसह ८३२.६५ रुपयांवर व्यवहार करत होता.
एफ अँड ओमध्ये समावेश झाल्यामुळे तिन्ही शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ झाली आणि त्यांच्या एक महिन्याच्या दिवसाच्या ट्रेडिंग सरासरीपैकी निम्म्याहून अधिक व्यवहार एका तासापेक्षा कमी वेळात झाले. निफ्टी ५० निर्देशांकात सामील होण्यासाठी कोणत्याही शेअरला एफ अँड ओ सेगमेंटमध्ये सामील होणे बंधनकारक आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.