Adani group stocks: अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये (Adani Ports Share Price) वाढ दिसून येत आहे. या वाढीमागील कारण म्हणजे पालनजी ग्रुपनं मंगळवारी ब्राउनफिल्ड गोपालपूर बंदर अदानी पोर्ट्स आणि एसईझेड लिमिटेडला ३,३५० कोटी रुपयांना विकण्याची घोषणा केली. ओडिशातील गोपालपूर बंदराचं एसपी समूहानं २०१७ मध्ये अधिग्रहण गेलं होतं. सध्या ते २० एमटीपीए हाताळण्यास सक्षम आहे.
अदानी पोर्ट्सचे शेअर्स आज सकाळी १२८१.६० रुपयांवर उघडले आणि लगेच १३०८ रुपयांवर पोहोचले. सकाळी १०.१५ च्या सुमारास शेअर १२९९ रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या सहा महिन्यांत, अदानींच्या या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ५८ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्यानं आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १३६५.५५ रुपये आहे आणि नीचांकी स्तर ५७१.५५ रुपये आहे.
ग्रीनफिल्ड एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनल उभारण्यासाठी बंदरानं अलीकडेच पेट्रोनेट एलएनजीसोबत करार केला आहे. गोपाळपूर बंदराची विक्री ही एसपी ग्रुपची गेल्या काही महिन्यांतील बंदरातील दुसरी निर्गुंतवणूक असल्याची माहिती एसपी ग्रुपनं एका निवेदनाद्वारे दिली आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)