Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये (Adani Group Stocks) घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. सेबीच्या कारणे दाखवा नोटीसमुळे अदानींच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याची माहिती समोर येतेय. आज बाजार उघडल्यापासून अदानीं समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. अदानी पॉवर ३.२८ टक्क्यांनी घसरून ५८४.८५ रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचा शेअरही ४.२७ टक्क्यांनी घसरून २८६५.५० रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी ग्रीन एनर्जीमध्येही घसरण झाली असून तो १.९३ टक्क्यांनी पडून १७६५ रुपयांवर आला.
अदानी पोर्ट्समध्ये ४.४७ टक्क्यांची घसरण झाली असून तो १२६१.३० रुपयांवर आला. अदानी टोटल गॅसही २.५४ टक्क्यांनी घसरून ९०६.८० रुपयांवर आला. अदानी एनर्जी सोल्युशनमध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तो १०३९.७० रुपयांवर ट्रेड करत होता. तर अदानी विल्मर २ टक्क्यांनी घसरून ३३७.३५ रुपयांवर आला. एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
सेबीने का दिली नोटीस
अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाशी (SEBI) संबंधित देवाणघेवाणीच्या कथित उल्लंघन आणि लिस्टिंग नियमांचं पालन न केल्यानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी २०२३ मध्ये अदानी समूहावर कॉर्पोरेट फसवणुकीचे गंभीर आरोप केल्यानंतर केलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून सेबीने या सहा कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर यांनी आपापल्या जानेवारी-मार्च तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या आर्थिक निकालांमध्ये सेबीच्या नोटीसबद्दलची माहिती दिली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)