Adani Group : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली आहे. मुंबई येथील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेले रिलायन्स जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर याचं उत्तम उदाहरण आहे. मात्र, या क्षेत्रात आता उद्योगपती गौतम अदानी यांनी उडी घेतली आहे. देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मालकीचे अदानी समूह आर्थिक राजधानी मुंबईत सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर (International Convention Centre)बांधणार आहे, ज्यासाठी २ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १७००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अदानी समूहाच्या या कन्व्हेन्शन सेंटरच्या उभारणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रिलायन्स जिओच्या वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला थेट आव्हान असणार आहे.
कन्व्हेन्शन सेंटरच्या डिझाईनला मंजुरी
मिंटच्या अहवालानुसार, अदानी समूहाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक कन्व्हेन्शन सेंटर बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याच्या डिझाइनला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची सविस्तर ब्ल्यू प्रिंट येत्या २ महिन्यांत मंजूर होईल, असे सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. अदानी समूहाच्या या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये २७५ खोल्यांचे पंचतारांकित हॉटेलही बांधण्यात येणार आहे. या कन्व्हेन्शन सेंटरचे हब विलेपार्लेच्या पश्चिम उपनगराजवळ बांधले जाणार आहे.
१५००० ते २०००० पर्यंत बसण्याची सोय
अदानी समूहाचे हे कन्व्हेन्शन सेंटर १.५ दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधले जाईल, ज्यामध्ये १५००० ते २०००० लोकांसाठी बसण्याची सोय असेल. त्या तुलनेत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर 1 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले आहे. अदानी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये १.२ दशलक्ष स्क्वेअर फूट इनडोअर एरिया असेल, त्यातील ०.३ दशलक्ष स्क्वेअर फूट वाहन पार्किंग आणि इतर कारणांसाठी वापरला जाईल. अदानी समूहाचे रिअल इस्टेट प्रकल्प अदानी रियल्टीच्या मालकीचे आहेत. परंतु, या कन्व्हेन्शन सेंटरची मालकी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सकडेच राहील. अदानी समूह देशात एकूण ११ विमानतळ चालवतो.
कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून व्यापाराला चालना मिळणार
कन्व्हेन्शन सेंटर कोणत्याही मोठ्या शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालतात. अशा सेंटर्समध्ये परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली जातात ज्याद्वारे व्यापार आणि निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते. या केंद्रांमध्ये स्थानिक आणि जागतिक दोन्ही प्लेअर्स एकाच छताखाली येतात.