नवी दिल्ली : अदानी समूह बिहारात ८,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून १० हजार नवीन रोजगार निर्माण होतील. अदानी एंटरप्रायजेसचे संचालक प्रणव अदानी यांनी ही माहिती दिली.
‘बिहार बिझनेस कनेक्ट २०२३’मध्ये बोलताना प्रणव अदानी यांनी सांगितले की, बिहार हे आता एक आकर्षक गुंतवणूक ठिकाण बनले आहे. विशेषत: सामाजिक सुधारणा, कायदा व सुव्यवस्था स्थिती, साक्षरता आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात बदल दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अदानी समूह राज्यात ही गुंतवणूक करीत आहे. विविध क्षेत्रांत ही गुंतवणूक करण्यात येईल. त्यातून सुमारे १० हजार रोजगार निर्माण होतील. बिहारी तरुणांना त्याचा लाभ होईल. बिहारात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच या मागास राज्यात रोजगार निर्मितीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘बिहार बिझनेस कनेक्ट २०२३’चे आयोजन केले आहे.