Join us

अदानी समूह पुढील महिन्यापर्यंत 4 हजार कोटींचे कर्ज फेडणार; कोणत्या बँकांना मिळणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:46 PM

Adani Group : हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) दाव्यानंतर अदानी समूहाच्या व्यवसायावर जगभरात परिणाम होऊ लागला होता.

नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर अडचणींचा सामना करत असलेल्या अदानी समूहाने पुढील महिन्यापर्यंत 4,000 कोटी रुपये (50 कोटी डॉलर) कर्जाची परतफेड करणार असल्याचे म्हटले आहे. अनेक बँकांनी अदानी समूहाला पुनर्वित्त देण्यास नकार दिल्यावर बँकांच्या या हालचालीनंतर समूहाने हे विधान केले आहे. यापूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) दाव्यानंतर अदानी समूहाच्या व्यवसायावर जगभरात परिणाम होऊ लागला होता.

cnbctv18 नुसार, बार्कलेज पीएलसी, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसी आणि डच बँकेने अदानी समूहाला 4.5 बिलियन डॉलर (सुमारे 36 हजार कोटी रुपये) कर्ज दिले होते. हे कर्ज Holcim Ltd चे सिमेंट युनिट खरेदी करण्यासाठी देण्यात आले होते, ज्याचा एक भाग 9 मार्चपर्यंत थकबाकी आहे. समूहाने सांगितले आहे की, कर्जाचा एक भाग म्हणून, पुढील महिन्यात सुमारे 50 कोटी दिले जातील. दरम्यान, बँकांनी सध्या अदानी समूहाला पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला होता.

…तेव्हा कर्ज द्यायला तयार होत्याया प्रकरणाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, हिंडेनबर्गचा रिपोर्ट येण्यापूर्वी आठवडाभर बँका अदानी समूहाला पुनर्वित्त देण्यास तयार होत्या. पण, हिंडेनबर्गचा रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर अदानी समूहाच्या विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळे कंपनीच्या शेअरचीही विक्री सुरू झाली. या रिपोर्टचा सर्वाधिक फटका परदेशी बँकांना बसला आणि त्यांनी अदानी समूहाला कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली. टोटल एनर्जीने अदानी समूहासोबतचा अब्ज डॉलरचा प्रोजेक्टही सध्या थांबवला आहे.

गुंतवणूकदार मालमत्तांचे करत आहेत पुनरावलोकन एमएससीआय इंकने म्हटले आहे की, ते अदानी समूहाच्या काही सिक्युरिटीजचे पुनरावलोकन करत आहेत, तर जपानच्या अॅसेट मॅनेजरने देखील अदानी समूहातील आपल्या गुंतवणुकीचा आणि त्याच्या परिणामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाच्या शेअर्सवर आणखी दबाव राहील, असे विदेशी गुंतवणूकदारांचे हे संकेत आहेत.

बँकांसोबत अदानी समूहाकडून चर्चा सध्या आम्ही पुनर्वित्तीकरणासाठी बँकांशी बोलणी करत आहोत. त्यांच्या पेमेंटसाठीही अदानी समूह नियोजन करत आहे, असे अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, अदानी समूहाने एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्जाची परतफेड करण्याबाबत म्हटले आहे, जेणेकरून ते आपल्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करू शकेल. यापूर्वी, गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता करण्यासाठी 1.11 अब्ज डॉलर (जवळपास 9 हजार कोटी रुपये) कर्जाची परतफेड केली आहे.

टॅग्स :अदानीगौतम अदानीव्यवसाय