Adani Group: हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे परिणाम अद्यापही अदानी समूह सोसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठा तोटा सहन केलेला अदानी समूह हळूहळू या तडाख्यातून सावरत आहे. आताच्या घडीला अदानी समूहाला पैशांची नितांत गरज असल्याचे सांगितले जात आहे. निधी उभारण्यासाठी अदानी समूहाने एक मेगा प्लान तयार केला आहे. दोन कंपन्यांच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा केली आणि त्याला मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्रायझेस या दोन कंपन्यांना क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP) द्वारे नवीन इक्विटी फंड जारी करण्यास मान्यता मिळाली आहे. अदानी ट्रान्समिशन ८,५०० कोटी रुपये आणि अदानी एंटरप्रायझेस १२,५०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. अदानी समूह सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेल आणि बाजार नियामक सेबीच्या चौकशीखाली असतानाच ही निधी उभारणी करत आहे.
QIP द्वारे २१ हजार कोटी रुपये उभारले जातील
क्यूआयपी द्वारे एकूण २१ हजार कोटी रुपये उभारले जातील, असे अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशनने घोषित केले. अदानी एंटरप्रायझेसने १२,५०० कोटी रुपये तर अदाणी ट्रान्समिशनने ८,५०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. दोन्ही कंपन्यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर स्वतंत्र नियामक फायलिंग्जमध्ये सांगितले की, निधी उभारणीची प्रक्रिया QIP किंवा इतर प्रक्रियेद्वारे शेअर्स आणि/किंवा इतर पात्र सिक्युरिटीज जारी करून केली जाणार आहे.
दरम्यान, निधी उभारण्यामुळे समूहाकडून कर्ज फेडण्याच्या क्षमतेबद्दलची चिंता कमी होईल आणि गुंतवणूकदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात मदत होईल, अशी अदानी समूहाला आशा असल्याचे सांगितले जात आहे. हिंडेनबर्ग ग्रुपच्या आरोपांमुळे अदाणी समूहाच्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाला धक्का बसला असून, शेअर्सच्या किमती खाली आल्या.