Adani Group : गेल्या काही वर्षात अदानी समूहाची वेगवेगळ्या व्यवसायात चांगली घोडदौड सुरू आहे. अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांमध्ये त्यांची गणती होत आहे. यामध्ये आता आणखी भर पडणार आहे. अदानी समूहाने महाराष्ट्राला दीर्घकालीन ६,६०० मेगावॅट अक्षय ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जा पुरवण्याची बोली जिंकली आहे. कंपनीने यासाठी ४.०८ रुपये प्रति युनिट बोली लावली होती. JSW एनर्जी आणि टोरेंट पॉवरला धोबीपछाड देत अदानी समूहाने हा प्रकल्प मिळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राला फायदा?अदानी समूहाकडे हा प्रकल्प गेल्याने राज्य सरकारचा परिणामी ग्राहकांचा फायदा होण्याची शक्यता आहे. 25 वर्षांसाठी अक्षय आणि औष्णिक वीज पुरवठ्यासाठी अदानी समूहाची बोली लावली होती. महाराष्ट्र सध्या ज्या दराने वीज खरेदी करत आहे, त्यापेक्षा एक रुपया कमीने वीज मिळणार आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले. यामुळे राज्याच्या भविष्यातील वीज गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. शिवाय राज्य सरकारचे पैसेही वाचणार आहेत.
कधी होणार वीज पुरवठा?लेटर ऑफ इंटेंट (LOI) जारी केल्यापासून 48 महिन्यांच्या आत वीज पुरवठा सुरू करायचा आहे. बोलीच्या अटींनुसार, अदानी पॉवर संपूर्ण पुरवठा कालावधीत 2.70 रुपये प्रति युनिट दराने सौर ऊर्जा पुरवणार आहे. तर कोळशापासून उत्पादित विजेची किंमत कोळशाच्या किमतीच्या आधारावर निर्धारित असणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (एमएसईडीसीएल) मार्चमध्ये सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी 5,000 मेगावॅट आणि कोळशापासून निर्माण होणारी 1,600 मेगावॅट वीज खरेदी करण्यासाठी एक विशिष्ट निविदा काढली होती. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते जारी करण्यात आले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अदानी समूहाला हा प्रकल्प देण्यात आला आहे.
कोणत्या दराने बोली लावली?या निविदेमध्ये सर्वाधिक विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा आणि औष्णिक उर्जा या दोन्हींचा पुरवठा समाविष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरने करार जिंकण्यासाठी प्रति युनिट ४.०८ रुपये बोली लावली. तर दुसरी सर्वात कमी बोली JSW एनर्जीची होती ४.36 रुपये प्रति युनिट होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात ४.७० रुपये प्रति युनिट या दराने खरेदी केलेल्या विजेच्या सरासरी किमतीपेक्षा हे कमी आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) २०२४-२५ साठी सरासरी वीज खरेदी किंमत रुपये ४.९७ प्रति युनिट निश्चित केली आहे. अशा प्रकारे, अदानीने लावलेली बोली यापेक्षा सुमारे एक रुपया प्रति युनिट कमी आहे.
निविदा प्रक्रियेत 4 कंपन्यांनी घेतला सहभाग25 वर्षांसाठी वीज पुरवठा करण्याच्या निविदेत एकूण ४ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील औष्णिक वीज उत्पादक अदानी पॉवरची उत्पादन क्षमता १७ GW पेक्षा जास्त आहे, जी २०३० पर्यंत ३१ GW पर्यंत वाढेल. तिची उपकंपनी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे, ज्याची निर्मिती क्षमता ११ GW आहे. या कंपनीची क्षमता 2030 50 GW पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.