Join us

Adani Group: अदानींना धक्के पे धक्का! परदेशी कंपनीने विकले तब्बल ७० हजार शेअर्स; हिंडेनबर्ग इफेक्ट सुरुच 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 7:12 PM

Adani Group: महिनाभरात गौतम अदानींची संपत्ती १५० अब्ज अमेरिकन डॉलर्सने कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

Adani Group: अमेरिकेच्या हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर मागे लागलेले शुक्लकाष्ट गौतम अदानी यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीए. एकामागून एक धक्के अदानी समूहाला बसत असून, जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील गौतम अदानींचे स्थान आणखी घसरले आहे. यातच आता एका विदेशी कंपनीने अदानी समूहातील मोठी गंतवणूक काढून घेतल्याचे सांगतिले जात आहे. 

 हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाने एफपीओ मागे घेतला. यानंतर बड्या कंपन्यांच्या अधिग्रहण प्रक्रियेतून माघार घेतली. तसेच काही कंपन्यांनी अदानी समूहाशी होत असलेले करार रद्द केले. यानंतर आता जे.पी.मॉर्गनच्या इएसजीद्वारे अदानी समूहाच्या एसीसी सिमेंटमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक विकून टाकली आहे. जे. पी. मॉर्गननं एसीसी सिमेंटमधील ७० हजार शेअर्स विकले आहेत. 

मे २०२१ मध्ये केली होती गुंतवणूक

जे.पी. मॉर्गन या संस्थेने अदानी समूहाच्या कंपनीत मे २०२१ मध्ये गुंतवणूक केली होती. ब्लुमबर्गनुसार, अदानी समूहात ब्लॅकरॉ इंक डॉएचे बँक एजी फंड मॅनेजमेंट यूनिट, डीडब्ल्यूएस ग्रुप यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक कायम आहे. जे.पी.मॉर्गनच्या आणखी एका फंडने एसीसीमधील १३५० शेअर्स विकले आहेत. अदानी समूहाच्या एसीसी सिमेंटमध्ये ही गुंतवणूक गेल्या वर्षी करण्यात आली होती. सध्या जे.पी. मॉर्गन संस्थेची इएसजीद्वारे अदानी समूहामध्ये गुंतवणूक शिल्लक नाही.

अदानी फोर्ब्जच्या यादीत ३८ व्या स्थानी

हिंडेनबर्ग रिपोर्ट २४ जानेवारीला प्रसिद्ध झाला, त्यावेळी गौतम अदानी फोर्ब्जच्या जगभरातील श्रीमतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी होते. यानंतर झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर गौतम अदानी फोर्ब्जच्या यादीत ३८ व्या स्थानी घसरले आहेत. एका महिनाभरात गौतम अदानींची संपत्ती १५० अब्ज अमेरिकन डॉलर्सने कमी झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, जे.पी. मॉर्गन च्या नॉन-इएसजी फंडाकडून अदानी समुहातील गुंतवणूक कायम ठेवली आहे. जे. पी. मॉर्गन इएसजी ग्लोबल कॉर्पोरेट इंडेक्स एक इंटीग्रेटेड इनव्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स कॉर्पोरेट बेंचमार्क आहे. याद्वारे गुंतवणूक दर्जा आणि परतावा देणाऱ्या बाजारांना समाविष्ट केले जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अदानीगौतम अदानी