Join us

संरक्षण क्षेत्रात Adani आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत, ३ हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 9:38 AM

अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस २०२७ पर्यंत या संकुलांमध्ये ३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल

Missiles Complexes: अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस (Adani Defence & Aerospace) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संकुलांमध्ये गुंतवणूक करेल. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस २०२७ पर्यंत कानपूरमधील नवीन दारूगोळा आणि क्षेपणास्त्र संकुलांमध्ये ३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल, अशी माहिती कंपनीचे सीईओ आशिष राजवंशी यांनी दिली.  

दरम्यान, या संकुलाचं उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजी झालं होतं. यात दक्षिण आशियातील सर्वात मोठी दारूगोळा निर्मिती सुविधा असेल. याची सुरुवात १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनं झाली आहे आणि यामुळे सुमारे ४,००० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्थानिक कंपन्यांमध्ये अप्रत्यक्षपणे २० हजार नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 

यावर आहे विशेष लक्ष 

या सुविधा विशेष ५०० एकर जागेवर असतील आणि भारताच्या वार्षिक दारुगोळा आवश्यकतेच्या एक चतुर्थांश लहान कॅलिबर दारुगोळ्याच्या १५० मिलियन राउंड्सच्या स्वरूपात पहिल्या वर्षातच तयार केले जातील. पुढील १२ महिन्यांत मोठ्या कॅलिबर दारुगोळ्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल, ज्यापैकी १५०,०००-२००,००० राउंड कानपूर संकुलातून दरवर्षी तयार केले जातील. तिसऱ्या टप्प्यात मीडियम कॅलिबर दारुगोळा समाविष्ट असेल आणि तो २०२६ पर्यंत तयार होईल. 

क्षेपणास्त्रांवरही काम करा 

"याच्या समांतर आम्ही क्षेपणास्त्रांवरही काम करत आहोत, ज्याचा काही भाग हैदराबादमध्ये आणि काही भाग कानपूरमध्ये तयार केला जाईल. ही गुंतवणूक उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरमधील सर्वात मोठी आहे. उत्पादनांची गुणवत्ता आणि खर्च यावर भरवसा असल्यानं अदानी डिफेन्स ऑर्डरची वाट न पाहता क्षमतेमध्ये गुंतवणूक करत आहे, " असं राजवंशी म्हणाले. 

कंपनीनं काय म्हटलं? 

भारताच्या खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारचं पहिला अत्याधुनिक प्लांट संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देईल. समूहाच्या या संरक्षण उत्पादन युनिट्सचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि केंद्रीय कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणि यांनी केलं, असं कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.

टॅग्स :गौतम अदानीसंरक्षण विभागयोगी आदित्यनाथउत्तर प्रदेश