Join us

Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:46 AM

Gautam Adani Group News : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेतली आहे. पाहा कोणती आहे कंपनी आणि किती कोटींना झाली डील.

Gautam Adani Group News : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी आणखी एक सिमेंट कंपनी विकत घेतली आहे. अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट्सने ओरिएंट सिमेंट लिमिटेड (OCL) ८,१०० कोटी रुपयांच्या इक्विटी मूल्यावर विकत घेण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी सीके बिर्ला समूहाची आहे. या व्यवहाराची किंमत ३९५.४ रुपये प्रति शेअर इतकी निश्चित करण्यात आलीये. अंबुजानं कंपनीतील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे.

या अधिग्रहणामुळे अदानी सिमेंटला देशातील कोअर मार्केटमध्ये आपली उपस्थिती वाढण्यास मदत होईल आणि सिमेंट मार्केटमधील त्यांचा वाटा २ टक्क्यांनी वाढेल. अदानी समूह सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी आहे, तर अल्ट्राटेक पहिल्या स्थानावर आहे. अंबुजा सिमेंट्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एसएएसटी नियमावलीतील तरतुदींनुसार ओपन ऑफर ३-४ महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे.

काय म्हटलंय कंपनीनं?

"सीके बिर्ला समूह ग्राहककेंद्रित, तंत्रज्ञानाधारित आणि सेवा-आधारित व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सातत्यानं भांडवलाचं पुनर्वितरण करीत आहे. सिमेंट आणि पायाभूत सुविधांवर भर देणारा अदानी समूह ओरिएंट सिमेंटमध्ये सातत्यपूर्ण वाढीसाठी आमच्या लोकांसाठी आणि भागधारकांसाठी नवीन आदर्श मालक आहेत, असा आम्हाला विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया ओरिएंट सिमेंट आणि सीके बिर्ला समूहाचे चेअरमन सी.के.बिर्ला यांनी दिली.

शेअरमध्ये तेजी 

या घोषणेनंतर दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. अंबुजाचा शेअर १.४९ टक्क्यांनी वधारून ५८० रुपयांवर तर ओरिएंट सिमेंटचा शेअर १.६५ टक्क्यांनी वधारून ३५८.२५ रुपयांवर व्यवहार करत होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीअदानी