Join us  

Adani News : अदानींनी अंबानींना मागे टाकलं, संपत्तीत एका वर्षात ९५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:31 PM

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.

अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ मध्ये अदानी ११.६ लाख कोटींच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. ही आकडेवारी ३१ जुलै २०२४ पर्यंतची आहे. गेल्या वर्षी भारताने दर ५ दिवसांमध्ये एक नवीन अब्जाधीश तयार केला असल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

अदानीच्या संपत्तीत ९५ टक्क्यांची वाढ

या यादीनुसार गौतम अदानी आणि कुटुंबीयांच्या संपत्तीत ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी यांच्या संपत्तीत २५ टक्के तर शिव नाडर यांच्या संपत्तीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायरस पूनावाला आणि कुटुंबीयांच्या संपत्तीत ४ टक्के तर दिलीप सांघवी यांच्या संपत्तीत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानींनंतर कुमार मंगलम बिर्ला कुटुंबीयांच्या संपत्तीत सर्वाधिक ८७ टक्के वाढ झाली.

वेल्थ क्रिएशनच्या रुपात उदयास

हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्क्यांची घट झाली, तर भारतात २९ टक्क्यांनी वाढ झाली आणि विक्रमी ३३४ अब्जाधीशांवर पोहोचले. 

हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार मुकेश अंबानी १,०१४,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर आणि कुटुंबीय यंदा ३,१४,००० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस पूनावाला आणि कुटुंबीय या यादीत चौथ्या स्थानावर आहेत, तर सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी पाचव्या क्रमांकावर आहेत.

गेल्या पाच वर्षांत भारतातील सहा व्यक्ती सातत्यानं टॉप १० मध्ये आहेत. या यादीत गौतम अदानी आणि कुटुंबीय आघाडीवर आहे. त्या खालोखाल मुकेश अंबानी आणि कुटुंबीय, शिव नाडर, सायरस एस पूनावाला आणि कुटुंबीय, गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबीय, तसंच राधाकिशन दमानी आणि कुटुंबाचा क्रमांक लागतो.

टॅग्स :गौतम अदानीमुकेश अंबानी