गौतम अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी शुक्रवारी खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे अंबुजा सिमेंटमधील सुमारे २.८ टक्के हिस्सा विकला. हा हिस्सा जीक्यूजी पार्टनर्ससारख्या गुंतवणूकदारांना ४,२५० कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. प्रवर्तकांनी अदानी समूहातील आपला हिस्सा इच्छित पातळीवर राखण्यासाठी नियमित समायोजनाचा भाग म्हणून अंबुजा सिमेंट्सचा हिस्सा विकला.
जीक्युजी पार्टनर्सनं खरेदी केले शेअर्स
राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्सनं अंबुजा सिमेंटमधील ४.३९ कोटी शेअर्स (१.७८ टक्के हिस्सा) दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये बल्क डील्सद्वारे खरेदी केला. हे शेअर्स सरासरी ६२५.५० रुपये प्रति शेअर दरानं खरेदी करण्यात आले असून, याचं एकत्रित मूल्य २,७४६.७९ कोटी रुपये आहे. या मोठ्या व्यवहारानंतर फोर्ट लॉडरडेलस्थित असेट मॅनेजमेंट कंपनी जीक्यूजी पार्टनर्सचा अंबुजा सिमेंटमधील हिस्सा १.३५ टक्क्यांवरून ३.१३ टक्क्यांवर गेला आहे.
होल्डरइंड इन्व्हेस्टमेंटकडून शेअर्सची विक्री
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) उपलब्ध आकडेवारीनुसार, अंबुजा सिमेंटचे प्रवर्तक होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडनं ६.७९ कोटी शेअर्स (२.८ टक्के हिस्सा) विकला आहे. हे शेअर्स सरासरी ६२५.५० रुपये प्रति शेअर दराने विकले गेले, ज्यामुळे व्यवहारमूल्य ४,२५०.६४ कोटी रुपयांवर पोहोचलं. या करारानंतर अंबुजा सिमेंटमधील होल्डरइंड इन्व्हेस्टमेंट्सचा हिस्सा ५०.९० टक्क्यांवरून ४८.१ टक्क्यांवर आला आहे. तसंच अंबुजा सिमेंटच्या प्रवर्तकांचा एकत्रित हिस्सा ७०.३३ टक्क्यांवरून ६७.५३ टक्क्यांवर आला आहे.
स्टॉकची स्थिती काय?
अंबुजा सिमेंटच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर तो शुक्रवारी ६३३.५५ रुपयांवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर ट्रेडिंगदरम्यान ६५९.७० रुपयांवर पोहोचला. मात्र, नंतर नफावसुली दिसून आली. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ७०६.८५ रुपये आहे. अदानींच्या नेतृत्वाखालील प्रवर्तक समूहाचे समूहातील १० लिस्टेड कंपन्यांमध्ये १२५ अब्ज डॉलरचे शेअर्स आहेत.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)