नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर उद्याेगपती गाैतम अदानी यांच्या संपत्तीत माेठी घट झाली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या २०च्या बाहेर फेकले गेले आहेत. एका दिवसातच त्यांची संपत्ती १० अब्ज डाॅलर्सनी घटली आहे. याशिवाय त्यांचा देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मुकुटमणीही हिरावला गेला असून, रिलायन्स उद्याेगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे या स्थानी विराजमान झाले आहेत.
अमेरिकेतील संस्था हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी यांच्या साम्राज्याला तडे जात आहेत. समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनिअर्स इंडेक्सनुसार, अदानींची संपत्ती गेल्या आठ दिवसांमध्ये सुमारे १२० अब्ज डाॅलर्स एवढी घटली आहे.
एका दिवसात ५ स्थान घसरले
हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी गाैतम अदानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर हाेते. सप्टेंबरमध्ये त्यांची संपत्ती १५५ अब्ज डाॅलर्स एवढी हाेती.
देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती हे उद्याेगपती मुकेश अंबानी ठरले आहेत. त्यांची मालमत्ता ८०.३ अब्ज डाॅलर्स एवढी आहे. जगात ते १२व्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती किंचित घटली आहे.
अमेरिकन शेअर बाजारातून ‘अदानी’चे समभाग बाहेर
नवी दिल्ली : अदानी समूहाचे समभाग अमेरिकेतील ‘डाऊ जोन्स’च्या ‘स्थिरता निर्देशांका’तून (सस्टेनेबिलिटी इंडेक्स) बाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अदानी समूहातील अदानी एंटरप्राइजेस, अदाणी पोर्टस् व स्पेशल इकॉनॉमिक झोन, तसेच अंबुजा सिमेंट या कंपन्यांना आधीच अतिरिक्त निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
‘फिच’चा दिलासा; मूडीजकडून त्तीय मजबुतीची समीक्षा सुरू
अदानी उद्योग समूहातील कंपन्यांच्या रेटिंगवर लगेच कोणताही परिणाम होणार नाही, असे मानक संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने म्हटले आहे. तर, ‘मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ने अदानी समूहातील कंपन्यांच्या वित्तीय मजबुतीचा अभ्यास सुरू केला आहे.
एसबीआयचे २७ हजार काेटींचे कर्ज
देशातील सर्वात माेठी बँक एसबीआयने अदानी समूहतील कंपन्यांना सुमारे २७ हजार काेटी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेने वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी हे केवळ ०.८८ टक्के एवढे असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली. बँकेने समभागांच्या मोबदल्यात काेणतेही कर्ज दिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जे ॲंड के’ बँकेचे ४०० काेटींचे कर्ज
जम्मू आणि काश्मीर बँकेने अदानी समूहाला १० वर्षांपूर्वी ४०० काेटी रुपयांचे कर्ज दिले हाेते. ते आता २४० ते २५० काेटी रुपये एवढे शिल्लक असल्याचे बँकेचे उपसरव्यवस्थापक निशिकांत शर्मा यांनी सांगितले.