Adani Ports News: अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा जगभरात डंका वाजत आहे. त्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या चार बंदरांना 'कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स २०२३'मध्ये स्थान तर मिळालंच, पण या श्रेणीतील ही सर्वात मूल्यवान कंपनीही बनलीये. अदानी पोर्टचं मार्केट कॅप ३८.०८ अब्ज डॉलर्स झालंय. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सीके हचिसन होल्डिंग्स असून त्यांचं मार्केट कॅप १८.२७ अब्ज डॉलर्स आहे.
इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल सर्व्हिस ११.७८ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अबुधाबी पोर्ट ७.२१ अब्ज डॉलरच्या मार्केट कॅपसह चौथ्या क्रमांकावर आहे. चीनची कंपनी चायना मर्चंट पोर्ट ६.५६ अब्ज डॉलरच्या मार्केट कॅपसह पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्टपोर्ट २.९८ अब्ज डॉलरसह या श्रेणीतील सहाव्या क्रमांकाची सर्वात मूल्यवान कंपनी आहे. पोर्ट ऑफ तारोंगा १.९६ अब्ज डॉलरसह सातव्या आणि हॅमबर्गर हाफेन १.३५ अब्ज डॉलरसह आठव्या स्थानावर आहे. सिहानुकव्हिल ऑटोनॉमस पोर्ट १.३४ अब्ज डॉलर आणि एचपीएस ट्रस्ट १.०८ अब्ज डॉलर अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.
अदानी पोर्ट्सची कामगिरी
जागतिक बँक आणि एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांनी विकसित केलेला हा निर्देशांक उत्पादकता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता या सारख्या निकषांवर बंदरांच्या कामगिरीचं मूल्यांकन करतो. अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडनं यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय. मुंद्रा पोर्ट २७ व्या, कट्टुपल्ली ५७ व्या, हजीरा ६८ व्या आणि कृष्णापट्टणम ७१ व्या स्थानावर असल्याचं त्यांनी म्हटलंय.
९ बंदरांचा टॉप १०० मध्ये समावेश
टॉप-१०० बंदरांच्या यादीत भारतातील एकूण नऊ बंदरांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये अदानी समूहाद्वारे चालविल्या जाणाऱ्या चार बंदरांचाही समावेश आहे. जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स २०२३ मध्ये आमच्या चार बंदरांना मान्यता मिळाल्याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया एपीएसईझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक अश्विनी गुप्ता यांनी दिली.