रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर जाणवला आहे. भारतातील शेअर बाजारही धडाम झाला होता. असे असले तरी अदानींच्या कंपनीचा शेअर १२ टक्क्यांनी उसळला होता. सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय या कंपनीला फायद्याचा ठरला.
अदानी पावरच्या बाजुने एका प्रकरणाचा निकाल लागला आहे. न्यायालयाने राजस्थानमधील तीन वीज वितरण कंपन्यांना आदेश देत अदानी पॉवरला 4200 कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. डिस्कॉमला हे पैसे चार आठवड्यांत अदानी पॉवरला द्यायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर अदानी पॉवरच्या समभागाला अचानक पंख लागले. 25 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांहून अधिक वाढले. कंपनीचा समभाग 12.15 टक्क्यांनी वाढून 123.30 रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये अजूनही तेजी राहण्याची चिन्हे आहेत. ट्रेंड-फ्लो ट्रेडर्ससाठी, 122-125 स्तरावर एक महत्त्वाचा आधार आहे. जर हा शेअर या पातळीच्यावर टिकून राहिला तर 140-147 रुपयांची पातळी गाठू शकतो.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या वर्षाच्या सुरुवातीला फेरविचार याचिका फेटाळल्यानंतर या तीन राजस्थानस्थित वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी भरलेली नाही. या प्रकरणात त्यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे.
या तिन्ही कंपन्यांनी 2022 मधील आदेशाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये अदानी पॉवरला नुकसान भरपाई देण्याच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता या कंपन्यांना अदानी पॉवरला एकूण 4,200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.