Adani Power Share : अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये आज, २७ ऑगस्ट रोजी सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. कंपनीनं मीडल ईस्टमध्ये एक नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. याचं नाव 'अदानी पॉवर मीडल ईस्ट लिमिटेड' असं ठेवण्यात आलंय. अदानी समूहानं शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती दिली. २६ ऑगस्ट रोजी २७,००० शेअर्सच्या अधिकृत भांडवलासह नवीन कंपनीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं.
आत्तापर्यंत या उपकंपनीनं आपला व्यवसाय सुरू केलेला नाही, त्यामुळे कंपनीची साईज आणि टर्नओव्हर या टप्प्यावर लागू होत नाही. वीज, पायाभूत सुविधा आणि संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करणं हा या नव्या कंपनीचा उद्देश असल्याचं अदानी समूहानं म्हटलंय.
शेअर्सच्या अधिग्रहणाच्या खर्चात २७ हजार डॉलर्सच्या शेअर कॅपिटलच्या सुरुवातीच्या सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. यामध्ये प्रत्येकाला १ डॉलर्सची फेस व्हॅल्यू असलेल्या २७ हजार शेअर्समध्ये विभागण्यात आलंय. फायलिंगनुसार नव्या कंपनीचं १०० टक्के शेअर कॅपिटल अदानी पॉवर लिमिटेडकडे आहे.
सकाळच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) अदानी पॉवरचा शेअर एक टक्क्यांनी वधारून ६७०.६५ रुपयांवर व्यवहार करत होता. यानंतर मात्र त्यात घसरण दिसून आली. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी पॉवरच्या शेअर्सनं गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट केलं असून या कालावधीत १०६ टक्के परतावा दिला आहे. त्या तुलनेत निफ्टीनं या काळात केवळ २७ टक्के परतावा दिला आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)