Adani News: अदानी आता दिवाळखोरीतील वीज कंपनी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरला लॅन्को अमरकंटक पॉवर खरेदी करण्यासाठी कर्जदारांची मंजुरी मिळाली आहे. ही थर्मल पॉवर उत्पादक कंपनी आक्रमकपणे आपली क्षमता वाढवण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत, ही डीलया आर्थिक वर्षातील इनसॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस अंतर्गत कंपनीचं दुसरं अधिग्रहण आहे. या संपादनासाठी अदानी पॉवरने किती रकमेची बोली लावली याचा खुलासा करण्यात आलेला नाही. लॅन्को अमरकंटक पॉवर छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात ३०० मेगावॅट थर्मल पॉवरचे दोन युनिट चालवते.
अदानी पॉवरला दिवाळखोरीतील लॅन्को अमरकंटक पॉवरचं अधिग्रहण करण्याच्या रिझोल्यूशन प्लॅनसाठी कर्जदारांची मंजुरी मिळाली आहे, असं मंगळवारच्या कंपनीच्या फायलिंगमधून समोर आलं आहे. "लॅन्को अमरकंटक पॉवरच्या कर्जदारांच्या समितीनं अदानी पॉवरनं सादर केलेल्या रिझॉल्युशन प्रोसेसला मंजुरी दिली आहे," असं त्यात म्हटलं आहे. लॅन्को युनिटच्या अधिग्रहणासाठी कंपनीला लेटर ऑफ इंटेंट मिळालं आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा असेट्स रिझॉल्युशन प्रोसेससाठी स्वीकार करण्यात आलं होतं, असं कंपनीनं म्हटलं.
अदानी पॉवरचं दुसरं अधिग्रहण
चालू आर्थिक वर्षात इन्सॉल्व्हन्सीच्या माध्यमातून अदानी पॉवरनं केलेलं हे दुसरं अधिग्रहण आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीनं म्हटलं होतं की अदानी पॉवरच्या कन्सोर्टियमला कोस्टल एनर्जीच्या रिझॉल्युशन प्रोफेशनलकडून ३४५० कोटी रुपयांच्या बोलीसाठी एलओआय मिळालं आहे. ते तामिळनाडूमध्ये ६०० मेगावॅट वीज क्षमतेचे दोन युनिट चालवते.