गौतम अदानी यांच्या कंपनीनं वांद्रे वरळीजवळील वांद्रे रेक्लेमेशनमध्ये महाराष्ट्रराज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) २४ एकरच्या मुख्य जमिनीच्या पुनर्विकासासाठी सर्वात मोठी बोली लावली आहे. अदानी रियल्टी ही दिग्गज लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत सर्वाधिक बोली लावणारी कंपनी बनली आहे.
अदानी रियल्टीनं राज्य सरकारच्या संस्थेला महसूलातील २३.१५% हिस्सा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर लार्सन अँड टुब्रोनं (L&T) प्रकल्पाच्या महसुलातील १८ टक्के हिस्सा ऑफर केली आहे. आता या कराराचा अंतिम निर्णय महाराष्ट्रराज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) घेणार आहे.
३० कोटींचा सरकारी प्रोजेक्ट
एमएसआरडीसीनं माहीम खाडीच्या समोर आणि सी लिंक अॅप्रोच रोडच्या बाजूनं कास्टिंग यार्ड आणि एमएसआरडीसी कार्यालय असलेल्या प्राइम लँड पार्सलसाठी बोली मागवल्या आहेत. हा भूखंड विकासासाठी व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी दिला गेला आहे आणि त्याची अंदाजे किंमत ३० हजार कोटी रुपये आहे. या लँड पार्सलचा संभाव्य डेव्हलपमेंट एरिया ४५ लाख चौरस फूट आहे.
एमएसआरडीसीनं काय म्हटलं?
एमएसआरडीसीचे एमडी अनिल कुमार गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय महसूल आधारित मॉडेलवर आधारित होता. अदानींची उच्च बोली नवीन आणि चालू असलेल्या पायाभूत प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त महसूल मिळवण्याच्या सरकारच्या स्वारस्याच्या अनुषंगाने आहे. बोली प्रक्रिया विशिष्ट विकासकांना अनुकूल असल्याच्या आरोपांचंही गायकवाड यांनी खंडन केले. "एमएसआरडीसीच्या बोली महसूल आधारित मॉडेलच्या असल्यानं, जास्तीत जास्त महसूल देणारा विकासक सरकारसाठी फायदेशीर आहे. अदानींनी अधिक बोली लावली आहे त्यामुळे ते आमचा पर्याय आहेत," असंही ते म्हणाले. एमएसआरडीसीच्या आगामी बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.