Join us

Adani च्या या कंपनीचा चौपट नफा, शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; एक्सपर्ट म्हणाले, ₹२७५० वर जाणार भाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 3:13 PM

कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यापासून गुंतवणूकदारांनी शेअर्सवर उड्या घेतल्या आहेत.

ACC Share price: अदानी समूहाची सिमेंट कंपनी एसीसीनं (ACC) डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यापासून गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्सवर उड्या घेतल्या आहेत. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी एसीसी सिमेंटच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. ट्रेडिंग दरम्यान, कंपनीच्या शेअरची किंमत 2576.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. 2494.50 च्या आधीच्या बंद किंमतीच्या तुलनेत यात सुमारे 3 टक्क्यांची वाढ झाली. या शेअरवर एक्सपर्ट बुलिश दिसत आहेत.

काय आहे टार्गेट प्राईज?

ब्रोकरेज ॲक्सिस सिक्युरिटीजनं एसीसी सिमेंटसाठी 2750 रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. यासोबतच शेअरला बाय रेटिंग देण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रवर्तकांकडे कंपनीत 56.69 टक्के हिस्सा होता, तर एफआयआयकडे 6.24 टक्के आणि डीआयआयकडे 24.05 टक्के हिस्सा होता. अदानी समूहानं 2022 मध्ये एसीसी सिमेंटचं अधिग्रहण केलं होतं.

डिसेंबर तिमाहीचे निकाल

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर, 2023) एसीसी सिमेंटचा निव्वळ नफा चार पटीने वाढून 537.67 कोटी रुपये झाला आहे. कंपनीनं याचं श्रेय उत्पादन क्षमता वाढवणं आणि इंधनाच्या खर्चात घट यांना दिलंय. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 113.19 कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 4,536.97 कोटी रुपयांवरून या तिमाहीत ऑपरेशनल इन्कम 8.31 टक्क्यांनी वाढून 4,914.36 कोटी रुपये झाले आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यामधील तज्ज्ञांचं मत त्यांचं वैयक्तिक मत आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :अदानीगौतम अदानीशेअर बाजार