Adani Group Share in Sensex : अदानी समूहासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. २४ जून रोजी सेन्सेक्समध्ये विप्रोची जागा अदानी समूहातील अदानी पोर्ट्स घेणार आहे. सेन्सेक्समध्ये सामील होणारी ही अदानी समूहाची पहिली कंपनी असेल. वेळोवेळी ३० शेअर्सचा बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्समध्ये बदल होत असतात. याअंतर्गत विप्रो या निर्देशांकातून बाहेर पडणार असून अदानी पोर्ट्सची यात एन्ट्री होणार आहे.
दोन्ही कंपन्यांच्या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर गेल्या वर्षभरात त्यात ९६ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. त्या तुलनेत बीएसईवर विप्रोचे शेअर्स केवळ २८ टक्क्यांनी वधारले आहेत. विप्रोचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५४६.१० रुपये आणि नीचांकी स्तर ३७५ रुपये आहे. तर अदानी पोर्ट्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६०७.९५ रुपये आणि नीचांकी स्तर ७०२.८५ रुपये आहे.
अदानी पोर्ट्सनं आतापर्यंत ४० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिले आहेत. तर विप्रोनं केवळ ३.५३ टक्क्यांचे रिटर्न दिलेत. विप्रोचं मार्केट कॅप २.५८ लाख कोटी रुपये आहे. तर अदानी पोर्ट्सचं मार्केट कॅप ३.१८ लाख कोटी रुपये आहे.
टॉप ३० कंपन्यांचा सेन्सेक्समध्ये समावेश
सेन्सेक्समध्ये देशातील टॉप ३० कंपन्यांचा समावेश होतो. सेन्सेक्सची गणना फ्री फ्लोट कॅपिटलायझेशनच्या आधारे केली जाते. सेन्सेक्समध्ये स्टॉक्सला घेण्याची किंवा बाहेर करण्याची प्रक्रिया सहा महिन्यांच्या रिव्ह्यूद्वारे केली जाते.
अदानी पोर्ट हे देशातील सर्वात मोठे पोर्ट ऑपरेटर आहे. यात १३ बंदरे आहेत. यामध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदर, टूना टर्मिनल, दहेज बंदर आणि हजीरा बंदराचा समावेश आहे. तर, अदानींचं महाराष्ट्रात दिघी बंदर आहे. मुरगाव टर्मिनल नावाचं एक बंदर गोव्यात आणि विझिंगम बंदर केरळमध्ये आहे. पश्चिम बंगालमधील हल्दिया, ओडिशातील धामरा, आंध्र प्रदेशातील गंगावरम आणि कृष्णापट्टणम ही बंदरं आहेत. याशिवाय तामिळनाडूत कट्टूपल्ली टर्मिनल आणि एन्नोर टर्मिनल अशी दोन बंदरे आहेत.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारती गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)