Adani Group Stocks: हिंडेनबर्गच्या नव्या आरोपांनंतर आज अदानी समूहाच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. महाराष्ट्रातून मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर अदानी पॉवर आणि ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये वाढ झाली. कामकाजदरम्यान, अदानी समूहाचे सर्वच शेअर तेजीत होते. महाराष्ट्र डिस्कॉमनं ६,६०० मेगावॅट हायब्रीड सौर आणि औष्णिक ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी लेटर ऑफ इंटेंट जारी केलं आहे. अदानी ग्रीन खावडा येथून ५ गिगावॅट (५,००० मेगावॅट) सौर ऊर्जेचा पुरवठा करणार आहे, तर अदानी पॉवर आपल्या नवीन १,६०० मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल क्षमतेतून १,४९६ मेगावॅट औष्णिक वीज पुरवठा करेल.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गनं अदानी समूहाची स्विस खाती गोठवण्यात आल्याच्या वृत्ताचा हवाला दिला होता. अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर ग्रुपच्या शेअर्सवर काहीसा दबाव आला होता, पण आज गुंतवणूकदारांनीही शेअर्समध्ये जोरदार खरेदी करून हिंडेनबर्गला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सुरुवातीला तेजी
सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पॉवरचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वधारले आणि तो ६७७.८५ रुपयांवर पोहोचला. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ६ टक्क्यांनी वधारून १८९६ रुपयांवर व्यवहार करत होता. तर अदानी एंटरप्रायझेसमध्ये १.८७ टक्क्यांची वाढ झाली. सकाळी पावणेनऊच्या सुमारास अदानी विल्मर ३.६३ टक्क्यांनी वधारून ३७३.५० रुपयांवर पोहोचला. अदानी पोर्ट्सही १४६० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.
अदानी एनर्जी सोल्यूशनचा शेअर २.१२ टक्क्यांनी वधारला आणि १००४.१५ रुपयांवर व्यवहार करत होता. एसीसीमध्येही तेजी दिसून आली आणि तो २५२९ रुपयांवर व्यवहार करत होता. अंबुजा सिमेंटचा शेअर ०.११ टक्क्यांनी वधारून ६३०.३० रुपयांवर तर एनडीटीव्हीचा शेअर २.५९ टक्क्यांनी वधारून १९७.९३ रुपयांवर व्यवहार करत होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)