गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा झटका बसला होता. अदानी समूह हिंडनबर्गच्या या संकटातून जवळपास बाहेर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला आहे. असं असूनही, यातील काही कंपन्यांचे शेअर्स सावरले आहेत, तर काही अद्यापही वर आलेले नाहीत.
आताही अदानी टोटल गॅसच्या शेअरची किंमत गेल्या वर्षाच्या तुलनेत 74 टक्क्यांनी कमी आहे. वर्षभरापूर्वी या स्टॉकची किंमत 3805.45 रुपये होती आणि आता त्याची किंमत 989.00 रुपये आहे. तर अदानी पॉवरच्या शेअरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहेत. अदानी एंटरप्रायझेस सुमारे 16 टक्क्यांनी वाढून 2925.05 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अदानी ट्रान्समिशन, ज्याला आता अदानी एनर्जी सोल्युशन्स म्हणून ओळखलं जातं, त्याच्या शेअरच्या किंमतीत गेल्या एका वर्षात 60 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तो आता 2710.65 रुपयांवरून 1065.50 रुपयांवर आलाय. अदानी विल्मरही 566 रुपयांवरून 356.60 रुपयांवर घसरला आहे. अदानी ग्रीन 18.18 टक्क्यांनी घसरला आहे. एका वर्षापूर्वी 1954.30 रुपये किंमत असलेला हा स्टॉक 1599 रुपयांवर आला होता. शेअर 2184 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावरुन 439.10 रुपयांपर्यंत घसरला होता.
अदानी पॉवरमध्ये तेजी
अदानी पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. 277.40 रुपयांवरून 90.94 टक्क्यांनी झेप घेतल्यानंतर हा शेअर आता 529.95 रुपयांवर पोहोचला आहे.
अदानी पोर्ट्समध्येही वाढ
अदानी पोर्ट्सनं गेल्या एका वर्षात 48.83 टक्के परतावा दिला आहे. हा स्टॉक 19 जानेवारी 2023 रोजी 776.05 रुपयांच्या किंमतीवरून 1155 रुपयांवर गेला आहे.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)