अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. अदानी पॉवरचे शेअर्स कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात 3.15 टक्क्यांनी वाढून 143.90 रुपयांवर व्यवहार करत होते. कामकाजादरम्यान अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली असून ते 146.30 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे मोठे कारण आहे. खरेतर, राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (NCLAT) 2019 मध्ये सादर केलेला कोरबा वेस्ट पॉवरच्या कर्ज निराकरणाचा अदानी पॉवरचा प्रस्ताव कायम ठेवला आणि प्रलंबित दाव्यांसाठी लवाद प्रक्रियेत शापूरजी पालोनजी अँड कंपनीला जाण्यास सांगितले आहे.
एनसीएलएटीच्या दोन सदस्यीय खंडपीठाने शापूरजी पालोनजी अँड कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला. या याचिकेत अदानी पॉवरने मांडलेल्या कर्ज निवारण प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या एनसीएलटीच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. NCLT च्या अहमदाबाद खंडपीठाने, 24 जून 2019 रोजीच्या आपल्या आदेशात, कर्जदार कंपनी कोरबा वेस्ट पॉवरच्या कर्ज निराकरणासाठी अदानी पॉवरने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, त्यावेळी कोरबा वेस्ट पॉवरकडे शापूरजी पालोनजी अँड कंपनीचे 45.22 कोटी रुपये थकीत होते आणि हे प्रकरण मध्यस्थी प्रक्रियेत होते.
अदानी पॉवरच्या शेअरची स्थितीहिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. या दरम्यान, अदानी पॉवरचा शेअर सुमारे 40 टक्क्यांनी घसरला आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 432.80 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 115.50 रुपये आहे. अदानी पॉवरचे मार्केट कॅप 55,462.78 कोटी रुपये आहे.