Join us

अदानी करणार १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक, फोर्ब्सच्या कार्यक्रमात दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:38 AM

सर्वाधिक गुंतवणूक ग्रीन एनर्जी उत्पादनावर

अदानी समूह पुढील १० वर्षांत १०० अब्ज डॉलरची (सुमारे ८.१३ लाख कोटी) गुंतवणूक करणार आहे. यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक ग्रीन एनर्जी उत्पादनावर होणार आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ही माहिती दिली. फोर्ब्सने मंगळवारी आयोजित केलेल्या २० व्या ‘ग्लोबल सीईओ कॉन्फरन्स’ मध्ये त्यांनी  ही माहिती दिली.

अदानी म्हणाले की, भारतातील डेटा सेंटर मार्केट खूप वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्रीन डेटा सेंटर उभारणे ही एक मोठी उपलब्धी असेल.

काय म्हणाले अदानी...

  • कंपनी सध्याच्या २० गीगावॉटच्या तुलनेत पुढील दशकात ४५ गीगावॉट ग्रीन एनर्जी उत्पादन करेल.
  • १ लाख हेक्टरमध्ये हा प्रकल्प पसरणार 
  • भारतामध्ये ३ गीगा फॅक्टरी तयार करणार
  • ग्रीन इलेक्ट्रॉन आणि ग्रीन हायड्रोजन उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित. तो निर्यातही करणार

एक समूह म्हणून आम्ही १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करू. यातील ७०% (सुमारे ५.६९ लाख कोटी रुपये) एनर्जी ट्रान्झिशन स्पेसमध्ये गुंतवले जातील. आम्ही सौर उद्योगात अव्वल स्थानावर आहोत, आम्हाला भविष्यात आणखी मोठ्या उंचीला स्पर्श करायचा आहे. कंपनी हायड्रोजन प्रकल्पात ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.     गौतम अदानी 

श्रीमंत यादीतून स्थान गमावले

  • शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे अदानींना मोठा झटका बसला आहे. सोमवारी त्यांची एकूण संपत्ती ५६ हजार २६२ कोटी रुपयांनी कमी झाली.
  • ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती १३५ अब्ज डॉलर राहिली आहे. 
  • तर मुकेश अंबानी हेही जगातील प्रमुख १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. 
  • त्यांच्या संपत्तीतही २.८३ अब्ज डॉलरची घसरण झाली असून, ती आता ८२.४ अब्ज डॉलर राहिली आहे. ते आता ११ व्या स्थानावर घसरले आहेत.
टॅग्स :अदानीफोर्ब्स