Adani Wilmar Adani total gas Q1 Result: उद्योगपती गौतम अदानी यांच्या दोन कंपन्यांनी सोमवारी(दि.29) त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत या दोन्ही कंपन्यांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे अदानी टोटल गॅसच्या नफ्यात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे अदानी विल्मरने तोट्यातून बाहेर पडून दमदार कामगिरी केली आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्येही 7 टक्क्यांनी वाढ झाली.
313 कोटींचा मोठा नफा
अदानी समूहाच्या 10 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यामतील FMCG कंपनी अदानी विल्मरचे पहिल्या तिमाहीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षी याच तिमाहीत अदानी विल्मरला 79 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. मात्र जून 2024 च्या तिमाहीत कंपनीला 313 कोटी रुपयांचा नफा झाला. अदानी विल्मरच्या महसुलातही जोरदार वाढ झाली आणि वार्षिक आधारावर हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढून 14169 कोटी रुपयांवर आला.
निकालाचा परिणाम शेअर्सवर दिसून आला
कंपनी तोट्यातून नफ्याकडे आल्याची माहिती अदानी विल्मरने स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल करताच अदानी विल्मरचे शेअर रॉकेटच्या वेगाने धावू लागले. या शेअरने आज 328 रुपयांवर व्यापार सुरू केला आणि Q1 निकाल जाहीर झाल्यानंतर हा 7 टक्क्यांच्या वाढीसह 349.70 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र, दिवसाच्या शेवटी हा किरकोळ घसरुन 344.80 रुपयांवर बंद झाला.
अदानी टोटलही नफ्यात
अदानी विल्मरसोबतच गौतम अदानी यांच्या अदानी टोटल गॅसनेही सोमवारीच आपले तिमाही निकाल जाहीर केले. फायलिंगनुसार, अदानी टोटल गॅसने पहिल्या तिमाहीत नफ्यात वाढ नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित नफा 150 कोटींवरून 172 कोटींवर गेला आहे. कंपनीचे उत्पन्न देखील जून 2023 मधील 1056 कोटी रुपयांवरून एप्रिल-जून 2024 मध्ये 1,145.4 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
अदानी टोटल गॅसच्या शेअरबद्दल बोलायचे झाले, तर कंपनीचा शेअर 900 रुपयांवर सुरू झाला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर अचानक सुमारे 2 टक्क्यांनी उसळी घेत 924.40 रुपयांवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी हा शेअर 891.90 रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 98,210 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)