अदानी समुहाच्या (Adani Group) प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली अदानी विल्मरचा आयपीओ पुढील आठवड्य़ात म्हणजेच २७ जानेवारीला खुला होणार आहे. अदानी समुहाची ही एफएमसीजी सेक्टरमधील प्रमुख कंपनी आहे. कंपनी Fortune ब्रँड नावाने खाद्यतेल, पीठ, तांदूळ आदी उत्पादने विकते. कंपनीचा आयपीओ २७ जानेवारीला सुरु होणार असून ३१ जानेवारीपर्यंत बंद होणार आहे.
यामध्ये कंपनी १ रुपयांचे मुल्य असलेले नवीन शेअर जारी करणार आहे. कंपनीला य़ा आयपीओमधून ३६०० कोटी रुपये गोळा करायचे आहेत. या शेअरची किंमत कंपनी आयपीओ सुरु होण्याच्या दोन दिवस आधी उघड करणार आहे.
प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी १९९९ मध्ये सिंगापूरच्या विल्मर कंपनीसोबत ही कंपनी बनविली होती. यामध्ये दोघांचीही ५०-५० टक्के हिस्सेदारी आहे. अदानी समुहाने एका वक्तव्यात म्हटले की, आयपीओशी संबंधीत रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस १९ जानेवारीला गुजरातच्या कंपनी रजिस्ट्रारकडे पाठविण्यात आले होते, २० जानेवारीला ते मंजुरही करण्यात आले आहे.
आधीच्या माहितीनुसार, अदानी विल्मरचा IPO 4,500 कोटी रुपयांचा असणार होता. परंतु PTI च्या 14 जानेवारी 2022 च्या अहवालानुसार, या IPO चा आकार आता 3,600 कोटी रुपये असेल.