मुंबई: अदानी विल्मरच्या शेअर्सची अडखळती सुरुवात पाहायला मिळाली. शेअर्सची इश्यू प्राईस २३० रुपये असताना आज त्याची किंमत २२१ रुपये इतकी आहे. सध्याच्या घडीला कंपनीचं भांडवली मूल्य २८ हजार ७२२ कोटी रुपये आहे.
स्वयंपाकासाठीची सामग्री निर्मिती क्षेत्रातील बलाढ्य कंपनी म्हणून अदानी विल्मर सुपरिचित आहे. एफएमसीजी क्षेत्रात कंपनीचा दबदबा आहे. आज कंपनीचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला. कंपनीचा शेअर इश्यू प्राईसपेक्षा १५ टक्के वर जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र शेअर बाजारातील अनेकांचा अंदाज चुकला. प्रत्यक्षात शेअरचा दर इश्यू प्राईसपेक्षा ३.९१ टक्क्यांनी कमी आहे.
खाद्यतेल उद्योगात अदानी विल्मरचं वर्चस्व आहे. पॅकेज फूड क्षेत्रात कंपनीची सातत्यानं होणारी वाढ, उत्तम नफा, पोर्टफोलियोमध्ये असणारं वैविध्य यामुळे अदानी विल्मरचा आयपीओ शेअर बाजारात जोरदार एँट्री घेईल असा अंदाज होता. मात्र सुरुवातीला आयपीओनं निराशा केली. त्यानंतर शेअर्सच्या किमती वधारल्या. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कंपनीच्या शेअरची किंमत २५३.७० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार नफ्यात आहेत.