हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी उद्योग समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अहवालानंतर अदानी उद्योग समूहाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. त्यानंतर अदानी समूहाला आणखी मोठा धक्का बसला होता. हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सिमेंटवादादरम्यान अदानी समूहाच्या काही औद्योगिक संस्थांवर स्टेट एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने छापा टाकला होता.
या पथकांनी बुधवारी हिमाचल प्रदेशमध्ये अदानी विल्मर ग्रुपच्या स्टोअरवर कारवाई केली. एक्साइज विभागातील साऊथ एन्फोर्समेंट झोनच्या टिमने बुधवारी संध्याकाळी परवाणू येथील अदानी स्टोअरवर जाऊन अदानी समूहाच्या रेकॉर्डची तपासणी केली. हा छापा कथितरित्या यासाठी टाकण्यात आला कारण कंपनीवर गेल्या ५ वर्षांत जीएसटी न भरल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान यानंतर आता अदानी समूहाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. तसंच यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सापडला नसल्याचं अदानी विल्मरकडून सांगण्यात आलं. या कारवाई अंतर्गत, कर विभागाने कंपनीच्या स्टेट ऑपरेशन्सशी संबंधित इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेमची माहिती मागवली आहे.
गैरव्यवहार नाहीअदानी विल्मरने एक निवेदन जारी करत म्हटलंय की कर विभागाच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या कामकाजात आणि व्यवहारात कोणतीही अनियमितता आढळली नाही. कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं, "आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की जीएसटी कायद्याच्या नियम 86B अंतर्गत कंपनीने कर दायित्व रोखीने भरणे आवश्यक नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की ही नियमित तपासणी होती. संबंधित अधिकारी आणि प्रसारमाध्यमांमध्ये म्हटल्याप्रमाणे हा छापा नाही.”
डिसेंबर तिमाहित 16 टक्के नफाकंपनीने 8 फेब्रुवारी रोजी आपले डिसेंबर तिमाही निकाल जाहीर केले, ज्या अंतर्गत कंपनीचा एकत्रित नफा 16 टक्क्यांनी वाढून 246.16 कोटी रुपये झाला आहे. अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत स्वयंपाकाचे तेल आणि इतर खाद्यपदार्थ विकते. हा एक संयुक्त उपक्रम आहे, ज्यामध्ये गौतम अदानी यांच्याव्यतिरिक्त सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनल लिमिटेडचाही हिस्सा आहे.