नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ मागे घेणाऱ्या अदानी समूहाने आता १००३ कोटी रुपयांची (१० अब्ज डॉलर) सार्वजनिक रोखे विक्रीही रद्द केली आहे. अदानी समूहाची ही पहिलीच सार्वजनिक रोखे विक्री होती, हे विशेष.
अदानी एंटरप्रायजेसने जानेवारीत रोखे विक्रीची योजना जाहीर केली होती. या रोखे विक्रीसाठी अदानी समूह एडलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, एके कॅपिटल, जेएम फायनान्शियल आणि ट्रस्ट कॅपिटल यांच्यासोबत काम करीत होता. हा प्रस्ताव आता मागे घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
डिस्कॉमकडून करार रद्द
उत्तर प्रदेशातील मध्यांचल विद्युत वितरण निगमने (एमव्हीव्हीएनएल) अदानी समूहासोबत केलेला ५,४०० कोटी रुपयांचा स्मार्ट वीज मीटर खरेदीचा करार रद्द केला आहे. अदानी समूहाकडून सर्वांत कमी किमतीची बोली प्राप्त झाली होती; तरीही हा सौदा रद्द केला आहे.
१११ कोटी डॉलर देऊन समभाग सोडविणार
प्रवर्तक कर्जदात्यांकडे तारण असलेले समभाग सोडवून घेण्यासाठी अदानी समूह १११.४ कोटी डॉलर अदा करणार आहे. या कर्जाची परिपक्वता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे. तथापि, मुदतीपूर्वीच ते सोडवून घेतले जातील, असे आश्वासन अदानी समूहाने दिले होते. गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाइी हे पाऊल उचलण्यात आले आहे.