अमेरिकेतील रिसर्च फर्म असलेल्या हिंडेनबर्गने देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि आशियातील टॉप १० मध्ये असलेल्या गौतम अदानी यांच्यासंबंधी एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर, अदानींच्या कंपन्यांमध्ये आणि शेअर मार्केटमोठी मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. अदानींचे शेअर्सही कोसळले होते, पण आता अदानी पुन्हा गियर टाकताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यात अदानी ग्रुपला यश मिळत आहे. नुकतेच अदानी ग्रुपने २.६५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केलीय. विशेष म्हणजे ही परतफेड वेळेपूर्वीच करण्यात आल्याने कंपनीवरील विश्वास पुन्हा दृढ होताना दिसत आहे.
अदानी ग्रुपकडून अंबुजा सीमेंटच्या अधिग्रहणासाठी घेण्यात आलेल्या कर्जात ५० कोटी डॉलरचे पेमेंटही सहभागी आहे. अदानी ग्रुपकडून रविवारी यासंदर्भात एक विधान जारी करण्यात आलंय. त्यानुसार, गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी कंपनीकडून वेळेपूर्वीच २.६५ अब्ज डॉलर्सचे कर्जाची रक्कम बँकांना देण्यात येत आहे. या कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मार्च २०२३ एवढी होती. मात्र, ग्रुपकडून यापूर्वीच संपूर्ण पेमेंट करण्यात आलंय.
अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांमध्ये स्टॉक्सला तारण ठेऊन २.१५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले होते. तर, अंबुजा सिमेंटच्या अधिग्रहणसाठी ५० अब्ज डॉलर्स देण्यात आले होते. दरम्यान, अदानी ग्रुपकडून सांगण्यात आलंय की, प्रमोटर्सचे अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंटच्या ६.६ अब्ज डॉलरच्या एकूण अधिग्रहण मुल्यांत २.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.