हिंडनबर्ग रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या अदानी समूहाला सर्वात मोठी गुंतवणूक मिळाली ती GQG पार्टनर्सकडून. जागतिक गुंतवणूकदार फर्म GQG पार्टनर्सने मार्च महिन्यात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून जी जोखीम पत्करली, ती मोठ्या फायद्याची ठरली. एप्रिल महिन्यानंतर, अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीने GQG पार्टनर्सच्या गुंतवणुकीचे एकूण बाजार मूल्य जवळपास 25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
GQG पार्टनर्स, ही राजीव जैन यांच्या मालकीची जागतिक गुंतवणूक फर्म आहे. या कंपनीची अदानी समूहाच्या 5 कंपन्यांमध्ये जवळपास 16 टक्के वाटा आहे.
कुणाची किती गुंतवणूक - GQG पार्टनर्सने मार्च महिन्याच्या अखेरीस अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जवळपास 1.9 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. यानंतर, मे महिन्यात जवळपास 500 मिलियन डॉलरचे स्टॉक्स खरेदी केले. तसेच, जूनमध्येही आणखी 1 बिलियनचे स्टॉक खरेदी केले. या गुंतवणुकींमुळे शेअरमध्ये तेजी येण्यास मदत मिळाली.
म्यूच्युअल फंडांनी जून महिन्यात अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 7 मध्ये आपला वाटा वाढवला. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायजेसने एप्रिलनंतर सर्वाधिक परतावा दिला आहे. या शेअरमध्य 41 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.
अदानी एंटरप्रायजेसमध्ये म्यूच्युअल फंडांचा वाटा चालू आर्थिक वर्षातील मार्च तिमाहीच्या 0.87 टकक्यांवरून जून तिमाहीत 1.18 टक्क्यांवर पोहोचला आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्येही चांगली तेजी आली आहे. या शेअरने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 19 टक्के परतावा दिला आहे.
गेल्या दोन सत्रांमध्ये अदानी ग्रुपच्या शेयर्समध्ये तेजीमुळे मार्केट कॅपिटल 57,000 कोटी रुपये वाढले आहे. बुधवार ग्रुपची मार्केट व्हॅल्यू 10.7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.