Join us  

'हिंडनबर्ग'मुळे अदानींचे शेअर्स कोसळले; पण ही कंपनी नेमकं काय करते, संस्थापक कोण?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:44 PM

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे.

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी समूहाच्या ९ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. अमेरिकेतील Hindenburg Research LLCने अदानी समूहाबाबत जाहीर केलेल्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअरवर परिणाम झाल्याचे उद्योग जगतात आणि शेअर बाजारात बोलले जात आहे. 

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात झालेल्या घसरणीचा फटका कंपनीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनादेखील बसला आहे. अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. एकाच दिवसात अदानी यांच्या संपत्तीत ६.५ अब्ज डॉलरची (सुमारे ५४००० कोटी रुपये) घट झाली आहे. दरम्यान, फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती ५.१७ टक्क्यांनी घटून ती ११९.१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. हिंडनबर्गच्या अहवालानुसार, अदानी ग्रुपने आपल्या कंपन्यांना ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्यवान दाखविण्यात आले आहे. तसेच, अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे, हा अहवाल प्रसिद्ध होताच अदानींच्या कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा अहवालात काहीही तथ्य नसल्याचं अदानी कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. 

एका अहवालामुळे अदानींचे शेअरमध्ये घसरण करणारी हिंडनबर्ग कंपनी नेमकी आहे तरी काय?, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्ग संस्थापक नॅथन अँडरसन आहेत. कनेक्टिकट विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी प्राप्त केलेल्या अँडरसनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात FactSet Research Systems Inc. या डेटा कंपनीमधून केली. येथे त्यांचे काम गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांशी संबंधित होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये त्यांची शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्च सुरू केली.

हिंडनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. हिंडेनबर्गकडून कोणत्याही कंपनीत गडबड आढळल्यास त्यावर अहवाल तयार केला जातो आणि नंतर तो सादर केला जातो. यामध्ये लेखासंबंधी अनियमितता, व्यवस्थापन स्तरावरील कमतरता आणि अघोषित संबंधित पक्ष व्यवहार या घटकांचा विशेष विचार केला जातो. 

गौतम अदानी यांनी आरोप फेटाळले-

अदानी समूहाने हे आरोप फेटाळात या अहवालाला वाईट हेतूने पसरवलेली निवडक चुकीची माहिती म्हटलं आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर बुधवारी या समूहाचं बाजारातील मूल्य तब्बल ११ अब्ज डॉलर्सने घसरलं. आता अदानी समूह हिंडनबर्ग रिसर्च विरोधात कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे. अदानी समूह भारतातल्या सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे.

प्रमुख श्रीमंतांच्या यादीत स्थान घसरले- 

आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आले आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आता जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायशेअर बाजार