नवी दिल्ली: कोरोनाकाळात जगभरातील अर्थचक्र थंडावले होते. या काळात अनेक देशांत मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे. भारतातही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच एशियन डेव्हलपमेंट बँकेने (Asian Development Bank) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशाचा चालू वित्त वर्षातील (2021-22) आर्थिक विकास दर म्हणजे जीडीपी (Gross domestic production India) कमी करून तो 10 टक्के केला आहे. यापूर्वी ADBने भारताचा विकास दर 11 टक्के राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. आता पुन्हा एडीबीने पुर्वीचा त्यांचा अंदाज बदलला आहे. एडीबीच्या मते, कोरोनामुळे भारताच्या विकास दरावर परिणाम झाला असून त्यामुळे हा दर बँकेने कमी केला आहे. (covid 19 impact on indian economy and gdp)
सकारात्मक बाब म्हणजे पुढील काही दिवसांत भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची शक्यताही एडीबीने व्यक्त केली आहे. भारतात येऊ पाहणारी कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात देशाला काही प्रमाणात यश आले आहे. त्यामुळे चालू वित्तीय वर्षातील पुढील तीन तिमाहीत चांगली रिकव्हरी होईल अशी शक्याताही एडीबीने व्यक्त केली आहे. ज्यामुळे पूर्ण वर्षाचा विकास दर 10 टक्के राहील. पण त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान विकास दरात घट होऊ शकते, असं अनुमान एडीबीने केले आहे.
एडीबीच्या वाढीचा अंदाज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाज बराच मिळता-जुळता आहे. आरबीआयने (RBI) चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के राहण्याची अपेक्षा जूनमध्ये सुधारित अंदाजानुसार व्यक्त केली आहे.