मुंबई : केंद्र सरकारने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे ५० कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली. येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की, देशात सध्या १०० कोटी लोक मोबाईलचा वापर करतात. पण ज्या प्रमाणात मोबाईलचा प्रसार झाला आहे, त्या प्रमाणात इंटरनेटचा प्रसार झालेला नाही. सध्या देशात ४० कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. २० कोटी इंटरनेट ग्राहकांची संख्या ३० कोटी होण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळेच याचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने वायफायच्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात या कामाला गती देण्यात येणार असल्याचे रवी शंकर प्रसाद म्हणाले. डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत देशातील तळागाळापर्यंत इंटरनेटचे तंत्रज्ञान पोहोचविण्याचा सरकारचा मानस असून, देशातील तब्बल अडीच लाख ग्रामपंचायतींची जोडणी करण्यात येईल. ई-शिक्षण, टेलिमेडिसिन, प्राथमिक आरोग्य केंद्रांची जिल्हा रुग्णालयांशी जोडणी अशा काही महत्वपूर्ण सेवा यामुळे तळागाळापर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. मुंबई शेअर बाजार टपाल तिकिटावर देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एक महत्वाचा शेअर बाजार असा लौकिक असलेल्या मुंबई शेअर बाजाराचा सन्मान करण्याच्या उद्दीष्टाने लवकरच भारतीय टपाल विभागातर्फे मुंबई शेअर बाजाराचे छायाचित्र असलेले विशेष टपाल तिकिट जारी करण्यात येणार असल्याची घोषणा प्रसाद यांनी केली. इंटरनेटवरील वित्तीय व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पेमेंट बँकेची संकल्पना आता देशात चांगलीच रुजली असून भारतीय पोस्टातर्फे ही मार्च २०१७ पासून पोस्टल पेमेंट बँक सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
इंटरनेटवर ५० कोटी नवे ग्राहक जोडणार
By admin | Published: January 11, 2016 3:10 AM