Nestle Product: तुम्हाला असे वाटत असेल की, प्रोसेस्ड फूडच्या नावाखाली तुम्ही तुमच्या बाळाला हेल्दी फूड देत आहात, तर ही रिपोर्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. लहान मुलांसाठी प्रोसेस्ड फूड बनवण्याच्या बाबतीत जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली नेस्ले कंपनी भारत सरकारच्या कचाट्यात आली आहे. ही कंपनी भारत आणि इतर आशियाई देशांसह आफ्रिकन देशांमध्ये विकणाऱ्या बेबी मिल्क आणि फूड सप्लिमेंट सेरेलॅकमध्ये साखर मिसळत असल्याची माहिती आहे. पब्लिक आय या स्विस इनव्हेस्टिगेशन ऑर्गनायझेशनने सादर केलेल्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सरकारने चौकशीचा निर्णय घेतला आहे.
संघटनेने आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बेबी फूड प्रोडक्टचे सँपल तपासण्यासाठी बेल्जियमच्या प्रयोगशाळेत पाठवले, तेव्हा ही बाब समोर आली. रिपोर्टनुसार, नेस्लेच्या निडो आणि सेरेलॅकच्या नमुन्यांमध्ये सुक्रोज किंवा मधाच्या स्वरुपात साखरेचे प्रमाण आढळले आहे. निडो हे एक वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लहान मुलांसाठी दुधाच्या रुपात वापरण्यासाठी आहे, तर सेरेलॅक सहा महिने ते दोन वर्षातील मुलांना दिले जाते. आता FSSAI नेस्लेच्या उत्पादनांवर लक्ष ठेवून आहे. नियामकाची वैज्ञानिक समिती याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने मांडली आपली बाजू
याप्रकरणी नेस्ले कंपनीने निवेदनात सादर करुन आपली बाजू मांडली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की, लहान मुलांना दिल्या आमच्या जाणाऱ्या बेबी प्रोडक्टमध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयरन इत्यादी पौष्टिक गोष्टी असतात. आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाही आणि करणार नाही. आम्ही हेदेखील सुनिश्चित करतो की, भारतात उत्पादित केलेली आमची उत्पादने कोडेक्स मानकांचे (WHO आणि FAO द्वारे स्थापन केलेला आयोग) काटेकोरपणे पालन करतात. नेस्ले इंडियासाठी अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यास प्राधान्य देते. गेल्या 5 वर्षांमध्ये आम्ही साखरेचे प्रमाण 30% पर्यंत कमी केले आहे. आम्ही नियमितपणे आमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करतो आणि आमची उत्पादने सुधारतो. नेस्ले इंडिया आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम पोषणयुक्त आहार देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही हे 100 वर्षांपासून करत आहोत. आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये पोषण, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानके कायम ठेवू, असे कंपनीने म्हटले आहे.
भारतात 250 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक विक्री
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, भारतात 2022 मध्ये विक्री 250 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होती. सर्व सेरेलॅक बेबी सेरिल्यच्या प्रत्येक सर्व्हिंगमध्ये सरासरी 3 ग्रॅम अधिक साखर आहे. दक्षिण आफ्रिकेतही हीच परिस्थिती आहे. येथील सर्व सेरेलॅक्समध्ये प्रत्येक सर्व्हिंगमध्ये चार ग्रॅम किंवा त्याहून अधिक साखर आहे. तर, ब्राझिलमध्ये तीन चतुर्थांश सेरेलॅक बेबी फूडमध्ये सरासरी अतिरिक्त 3 ग्रॅम सारख आहे.