दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपन्यांकडून जमा करण्यात आलेल्या अग्रीम करामध्ये ४९ टक्क्यांनी वाढ झाली असून, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा वाढीला लागल्याचे हे प्रसादचिन्ह असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, याच काळामध्ये वैयक्तिक प्राप्तिकर संकलनामध्ये मात्र ५.६ टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) चालू वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या अग्रीम कर संकलनाची आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. त्यामधून हे चित्र समोर आले आहे. मागील वर्षाच्या याच काळामध्ये कंपन्यांकडून कमी प्रमाणामध्ये कर भरला गेला असल्याने कर संकलनात मोठी वाढ झाल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
१५ डिसेंबर ही तिसऱ्या तिमाहीचा अग्रीम कर भरण्याची अंतिम तारीख असते. या तारखेपर्यंत कंपन्यांनी १,०९,५०६ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. मागील वर्षाच्या याच काळाशी तुलना करता ही रक्कम ४९ टक्क्यांनी वाढली आहे.
मागील वर्षाच्या याच तिमाहीमध्ये ७७,१२६ कोटी रुपयांचा अग्रीम कर कंपन्यांनी जमा केला होता. मागील वर्षी तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनी कराचा दर २५ टक्के अशा सर्वात खालील पातळीवर आणण्यात आला होता. त्यामुळे कंपन्यांकडून जमा केल्या जाणाऱ्या कराची रक्कम कमी झाली होती.
३१,०५४ कोटी रुपयांचे संकलन
तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या वैयक्तिक प्राप्तिकराच्या रकमेमध्ये ५.६ टक्क्यांनी कपात झाली आहे. या तिमाहीमध्ये वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांनी ३१,०५४ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीमध्ये ही रक्कम ३२,९१० कोटी रुपये होती. याचा अर्थ यंदा ५.६ टक्क्यांनी कर संकलन घटले आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये ६०,४९१ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर जमा करण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही अखेर ६७,५४२ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर जमा करण्यात आला होता.
अग्रीम कर संकलनामध्ये तब्बल 49 टक्क्यांची वाढ
तिसरी तिमाही : कंपनी करांमध्ये वृद्धी; प्राप्तिकरामध्ये मात्र घट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 02:43 AM2020-12-18T02:43:02+5:302020-12-18T02:43:13+5:30