ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वापरणं तुम्हाला लवकरच त्रासदायक ठरू शकतं. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना मध्येच तुम्हाला उद्योजकांचे मेसेज येऊ शकतात. थोडक्यात तुम्हाला जाहिरातींसारख्या कटकटचा सामना आता व्हॉट्सअॅपवरही करावा लागू शकतो. या नव्या चॅट सिस्टीमवर व्हॉट्सअॅप काम करत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
व्हॉट्सअॅपकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीने या बाबतीत चाचणी सुरू केली असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. याद्वारे उद्योजकांकडून त्यांच्या उद्योगाची माहिती देणारे मेसेज थेट तुम्हाला चॅटिंगदरम्यानच येतील. चाचणी दरम्यान व्हॉट्सअॅपने काही कंपन्यांनाही सहभागी करून घेतलं आहे.
जानेवारी 2016 मध्ये कंपनीने अशा प्रकारची सेवा सुरू करणार असल्याची शक्यता आपल्या ब्लॉगमध्ये वर्तवली होती. फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेण्यापूर्वी युजर्सकडून वर्षाला ठरावीक रक्कम वसूल करण्याचं ठरवलं होतं पण फेसबुकने विकत घेतल्यानंतर व्हॉट्सअॅप पूर्ण मोफत झालं. आता पैसे कमावण्यासाठी व्हॉट्सअॅफने ही नवी शक्कल लढवली आहे.
यापुर्वी व्हॉट्सअॅ्पनं आपल्या 8व्या वाढदिवसानिमित्त ‘स्टेटस’ फीचर लाँच केलं होतं. पण या नव्या फीचरमुळे अनेक यूजर्स नाखूश आहेत. अनेक यूजर्सना स्टेटस फीचर अजिबात आवडलेलं नाही. व्हॉट्सअॅपनं आपलं जुनं फीचर पुन्हा आणावं अशी मागणी युजर्सकडून होत आहे. युजर्सकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने व्हॉट्सअॅप पुन्हा एकदा आपलं जुनं स्टेटस फिचर आणण्याचा विचार करत आहे.