- प्रसाद गो. जोशी
ऑक्टोबर महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने बाजार घसरला. येत्या सप्ताहात परकीय वित्तसंस्था कोणती भूमिका घेतात याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. याशिवाय अमेरिकेत होत असलेल्या निवडणुका, खनिज तेलाचे दर, विविध देशांमध्ये सुरू असलेली युद्धे, अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक आणि इंग्लंड मधील व्याजदर वाढीचा निर्णय या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशांतर्गत पीएमआयची आकडेवारी, विविध कंपन्यांचे तिमाही निकाल या महत्त्वाच्या घटना असून त्यांचा बाजारावर परिणाम होऊ शकतो.
याआधी गेले चार सप्ताह घसरत असलेल्या बाजाराला गेल्या सप्ताहात थोडा आधार मिळाला. त्यामुळे सप्ताह अखेरीस बाजार हिरव्या रंगांमध्ये बंद झालेला दिसून आला. निफ्टीसह आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली. नवीन वर्षाच्या मुहूर्तांच्या सौद्यामध्ये बाजार वाढला. त्यामुळे बाजारात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा दिसून आली. त्याचा प्रभाव या सप्ताहात किती पडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे.
विक्रीचा मार थांबणार?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट कमिटीची बैठक येत्या सप्ताहात होणार असून त्यात व्याजदराचा निर्णय होणार आहे. याशिवाय बँक ऑफ इंग्लंड व्याजदर निश्चिती करणार आहे या दोन्ही घटनांचे परिणाम शेअर बाजारावर होणार आहेत. विविध कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत.
या सप्ताहात सुमारे ५०० कंपन्यांचे निकाल घोषित होणार असून त्यानुसार खरेदी विक्री होऊ शकते. तसेच कंपन्यांच्या पीएमआयची घोषणा होणार असून त्याचे निकाल काय येतात त्यावर बाजाराची दिशा ठरेल. याशिवाय परकीय वित्तसंस्था व देशांतर्गत वित्त संस्था यांच्या खरेदी विक्रीवर बाजार वाढणार की घटणार ते ठरणार आहे.
महिनाभर तुफान विक्री
-ऑक्टोबर महिन्यात बाजारांमध्ये परकीय वित्त संस्थांकडून तुफान विक्री झाली. या महिन्यात केवळ एकच दिवस या संस्थांकडून बाजारात खरेदी झाली आहे.
- जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये परकीय वित्तसंस्थांनी ९४ हजार १०७ कोटी काढले. चीनमध्ये अर्थव्यवस्थच्या वाढीचा दर चांगला होता आणि शेअरचे भाव त्यामानाने कमी असल्यामुळे अनेक कंपन्यांनी तेथे गुंतवणूक केली.
- भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवलेला पैसा काढला गेला. याच काळात देशांतर्गत वित्तीय संस्थांनी बाजारात १,०७ लाख कोटी रुपये गुंतवले. याआधी मार्च महिन्यात परकीय वित्त संस्थांनी ६१, ७४३ कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले होते.