Join us

अनुभवासह १० वर्षांनी मायदेशात परतून नवउद्योग सुरू करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:04 AM

आयआयटी मुंबईत सलग चार वर्षे सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुंबईच्या अनिकेत पाटणकर याने शनिवारी पार पडलेल्या दीक्षान्त सोहळ्यात सर्वांचीच मने जिंकली.

मुंबई : आयआयटी मुंबईत सलग चार वर्षे सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुंबईच्या अनिकेत पाटणकर याने शनिवारी पार पडलेल्या दीक्षान्त सोहळ्यात सर्वांचीच मने जिंकली. पुढील शिक्षण आणि अनुभवासाठी अनिकेत परदेशात जात असून १० वर्षांनंतर मायदेशी परतून समाजक्षेत्रात नवउद्योग सुरू करण्याचा विचार त्याने या वेळी व्यक्त केला.अनिकेत म्हणाला की, पदवी मिळाल्यानंतर एमआयटीमध्ये एमएसचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला आहे. तेथे पीएचडी करण्याचा मानस असून एमआयटीमध्ये संशोधनाशी संबंधित इतर अन्य विषय घेऊन पीएचडी करणार आहे. ही सर्व प्रक्रिया ६ वर्षांची असून त्यानंतर तीन वर्षे एका चांगल्या कंपनीत नोकरी करून शिक्षण व अनुभव घेऊन परिपक्व होऊनच माघारी परतेन. त्यानंतर मायदेशात आरोग्य क्षेत्रात समाजोपयोगी नवउद्योग सुरू करण्याचा विचार अनिकेतने व्यक्त केला.विक्रोळी येथे वाढलेल्या अनिकेतने आयआयटी मुंबईमधून अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली आहे. संशोधनाची आवड असल्याने त्याने संस्थेतील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मिलिंद अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनास सुरुवात केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या ‘क्रायोजेनिक इंजीन’च्या कुलिंग प्रक्रियेवर त्याने संशोधन केले. ही प्रक्रिया फारच खर्चीक असल्याने त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसरवर संशोधन करण्याचे त्याचे प्रयत्न आहेत.