रिलायन्स एडीए समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी या फेमा प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या. यापूर्वी सोमवारी अनिल अंबानीदेखील या प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले होते. परदेशी विनिमय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाशी निगडीत एका प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अधिकाऱ्यांनुसार निरनिराळ्या कलमांतर्गत नोंदवण्यात आलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवण्यात आला.
अनिल अंबानी कर्मचाऱ्यांसह सोमवारी बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. सुमारे दोन तास अंबानी यांची चौकशी चालली. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष असलेल्या अनिल अंबानी यांचा नेमक्या कोणत्या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला याची माहिती उपलब्ध नसली तरी फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ईडीनं त्यांच्यावर ठेवला आहे. यापूर्वीही २०२० मध्ये येस बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.
आयकर विभागाचीही नोटीसगेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल अंबानी यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयकर विभागानेही नोटीस जारी केली होती. त्यांनी स्वीस बँकेतील दोन खात्यांत ८१४ कोटी रुपये ठेवले होते व त्यावर लागू असलेला ४२० कोटी रुपयांचा कर चुकविल्याचा ठपका ठेवत काळ्या पैशांच्या कायद्यांतर्गत आयकर विभागाने त्यांना नोटीस जारी केली होती.