नॉन प्रॉफिट मीडिया संस्था OCCRP नं गौतम अदानी यांच्यानंतर आणखी एक भारतीय उद्योजक अनिल अग्रवाल यांना लक्ष्य केलं आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन अब्जाधीश उद्योजक जॉर्ज सोरोस यांचं समर्थन असलेल्या OCCRP या संस्थेनं अग्रवाल यांच्या कंपनी वेदांतानं कोरोना महासाथीच्या काळात पर्यावरणीय कायदे कमकुवत करण्यासाठी गुप्तपणे लॉबिंग केल्याचा आरोप केला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच OCCRP नं एका लेखात हा दावा केलाय.
सरकारनं नवीन पर्यावरण मंजुरी न घेता खाण कंपन्यांच्या उत्पादनात ५० टक्के वाढ करण्याची परवानगी द्यावी. यामुळे देशातील आर्थिक सुधारणेचा वेग वाढू शकतो, असं जानेवारी २०२१ मध्ये वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितलं होतं असा दावा यात करण्यात आलाय.
वेदांताची ऑईल कंपनी केयर्न इंडियानं ऑईल ब्लॉक्समध्ये एक्सप्लोरेटरी ड्रिलिंगसाठी जनसुनावणी संपवण्यासाठी यशस्वीपणे लॉबिंग केलं होतं, असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. देशातील एक प्रमुख नैसर्गिक संसाधन कंपनी असल्याने, ती देशांतर्गत उत्पादन वाढवून आयात कमी करण्याच्या उद्देशानं काम करत आहे, असं वेदांतानं OCCRP ला सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. "देशाच्या विकासाच्या हितासाठी आणि नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी सरकारला वेळोवेळी निवेदने दिली जातात," असं कंपनीच्या प्रवक्त्यानं OCCRP ला सांगितलं. दरम्यान, वेदांता आणि केर्न यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अदानी समूहावरही केलेले आरोपयापूर्वी OCCRP ने गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाला लक्ष्य केलं होते. अदानी समूहानं गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली होती, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या रिपोर्टनंतर गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे समूहाचे मार्केट कॅप सुमारे ४० हजार कोटी रुपयांनी घसरलं होतं.