अदानी समुहाच्या कंपन्यांवरील संकट (Adani Crisis) अजून संपलेलं नाही तोच आणखी एका कंपनीच्या कर्जावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हिंडेनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाला (Adani Group Shares) प्रचंड मोठा फटका बसला होता आणि त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. समूहाचे अनेक शेअर्समध्ये अद्यापही पूर्णपणे रिकव्हरी झालेली नाही.
दरम्यान, वेदांता रिसोर्सेसबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे. अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्सेस लिमिटेडला (Vedanta Resources) सुरू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मोठ्या कर्जाची परतफेड करायची आहे. कंपनीला व्याजासह तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. S&P ग्लोबल रेटिंगने सोमवारी ही माहिती दिली. रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की कंपनीकडे डिसेंबर २०२३ पर्यंत पुरेशी रोकड असेल.
वेदांता त्याच्या एका ऑपरेटिंग कंपनीद्वारे १ अब्ज डॉलर्सचं कर्ज उभारण्याच्या अगदी जवळ आहे. निवेदनानुसार, या कंपनीला तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचं आहे. यामध्ये व्याज आणि कर्जाचा समावेश आहे. मार्च २०२४ पर्यंत किमान १ अब्ज डॉलर्सची इतर दायित्वेही असतील. ज्यासाठी वित्तपुरवठा आवश्यक असल्याचे एस अँड पी नं एका निवेदनाद्वारे म्हटलंय.
शेअर्सच्या किंमतीत वाढ
वेदांता रिसोर्सेस ही वेदांता लिमिटेडची मूळ कंपनी आहे, जी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेडही आहे. वेदांता लिमिटेडनं गेल्या महिन्यात २०२२-२३ साठी पाचवा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. वेदांत लिमिटेडचा शेअर सोमवारी वाढीसह बंद झाला. तो २.८० टक्क्यांनी किंवा ७.७० रुपयांनी वाढून २८२.४० रुपयांवर बंद झाला. स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४४० रुपये आणि निचांकी पातळी २०६ रुपये आहे. बाजार बंद झाल्यावर कंपनीचं मार्केट कॅप बीएसईवर १,०४,९७३ कोटी रुपये होतं.