Join us  

Go Firstच्या पायलट्सना TATA आशेचा किरण! नोकरीसाठी Air India मध्ये अर्ज, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 3:25 PM

टाटासोबत आमचे भविष्य सुरक्षित आहे, अशा भावना नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

Air India Job: Go First या परवडणाऱ्या दरात विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे चाक आर्थिक गर्तेत रूतले आहे. कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. डीजीसीएने ‘गो फर्स्ट’ला ३ मे आणि ४ मेची उड्डाणे रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘गो फर्स्ट’ने निधीच्या तीव्र चणचणीमुळे ९ मेपर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. यातच आता या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या TATA ची मालकी असलेल्या Air India मध्ये वैमानिकांची भरती प्रक्रिया सुरू असून, Go Firstच्या वैमानिकांनी एअर इंडियामध्येनोकरीसाठी अर्ज केले असून, जॉब ड्राइव्हमध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाडिया समूहाच्या मालकीची  ‘गो फर्स्ट’ विमान कंपनी प्रचंड आर्थिक संकटात आहे. यातच या कंपनीच्या वैमानिकांनी दिल्लीत सुरू असलेल्या एअर इंडियाच्या जॉब ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला. तसेच काही वैमानिकांनी कंपनीतील स्थितीबाबत प्रतिक्रिया दिली. Go Firstने सर्व काही सुरळीत सुरू आहे, असेच दाखवले. हे खूप निराशाजनक आहे, एअरलाइन सर्वकाही सामान्य असल्यासारखे वागत होती. आमचे फ्लाइंग लायसन्स सुरू ठेवण्यासाठी आम्हाला नवीन नोकरी शोधण्याची गरज आहे, अशा वैमानिकांनी सांगितले. 

GoFirstचे कर्मचारी एअर इंडिया आणि विस्ताराच्या जॉब ड्राईव्हमध्ये 

GoFirst कर्मचाऱ्यांनी एअर इंडिया आणि विस्ताराच्या सुरू असलेल्या जॉब ड्राईव्हमध्ये गर्दी केल्याचे सांगितले जात आहे. एअर विस्ताराने दिल्ली आणि मुंबईतील केबिन क्रूसाठी वॉक-इन मुलाखती घेतल्या. वैमानिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले. या जॉब ड्राइव्हमध्ये सहभाग घेतलेल्या GoFirst केबिन क्रूच्या सदस्यांनी सांगितले की, टाटासोबत आमचे भविष्य सुरक्षित आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले, की गेल्या आठवड्यात वैमानिकांच्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून ७०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच या नोकरभरतीसाठी अर्जाची मुदत वाढवली असल्याचेही सांगितले जात आहे. टाटा समुहाने एअर इंडियामध्ये यावर्षी ४,२०० हून अधिक केबिन क्रू आणि ९०० पायलट घेण्याची योजना आखली आहे.

दरम्यान, एअर इंडिया, विस्तारा यांसह देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो यांनी अशाच प्रकारच्या जॉब ड्राइव्ह चालवल्या आहेत. अनेक कर्मचार्‍यांशी मीडियाने संवाद साधला असता, ते म्हणाले की, अशा जॉब ड्राइव्हमध्ये मोठी गर्दी आहे. GoFirst मुळे अर्जदारांची संख्या वाढल्याचे म्हटले जात आहे. ‘गो फर्स्ट’ ही देशातील तिसरी सर्वांत मोठी विमान कंपनी आहे. पूर्वी गो एअरलाइन्स (इंडिया) लिमिटेड म्हणून ही कंपनी ओळखली जात होती, या कंपनीत सुमारे ७ हजार कर्मचारी आहेत.

 

टॅग्स :एअर इंडियाटाटानोकरी