Budget Speech 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) २३ जुलै रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी ३.० चा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करू शकतात. जुन्या योजनाही सुरू ठेवण्याची शक्यता आहे.
मोदी सरकार पायाभूत सुविधांवर मोठा पैसा खर्च करत आहे. अशा तऱ्हेनं सरकार या अर्थसंकल्पातही पायाभूत सुविधांवर भर देऊ शकते. शेअर बाजाराचंही या अर्थसंकल्पावर लक्ष आहे. चला जाणून घेऊया बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. तसंच, कोणत्या कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरच्या कामगिरीवर बजेटचा परिणाम होऊ शकतो? पाहूया.
या कंपन्यांचे शेअर्स असतील फोकसमध्ये
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, अॅक्सिस सिक्युरिटीजनुसार बजेटमध्ये सरकारचा भर पॉवर आणि रिन्यूएबल एनर्जीवर असू शकतो. सरकार या दोन क्षेत्रांसाठी नवीन योजनांसह अधिक बजेट जाहीर करू शकते. तसंच सरकार काही बँकांच्या खासगीकरणाची घोषणा करू शकते.
मोदी सरकारनं गेल्या दोन टर्ममध्ये मोठ्या संख्येने गरीब कुटुंबांना घरं बांधण्यासाठी निधी दिला आहे. या अर्थसंकल्पातही ही योजना सुरू राहू शकते. तसंच सरकारकडून नवीन गृहनिर्माण योजनेची ही घोषणा केली जाऊ शकते. असं झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकांना मोठा नफा होऊ शकतो. अशापरिस्थितीत या बँकांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळू शकते. याशिवाय पीएफसी, आरईसी आणि इरेडाच्या शेअर्सवरही फोकस असेल.
पायाभूत सुविधांवर सरकारचा भर
सरकार पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अधिक बजेट जाहीर करू शकते. केएनआर कन्स्ट्रक्शन, पीएनसी इन्फ्राटेक, राइट्स, केईसी इंटरनॅशनल, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येण्याची शक्यता आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण पायाभूत सुविधांमध्ये अधिक निधीची घोषणा केल्याने सिमेंटची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
या अर्थसंकल्पानंतर रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे विकास निगम लिमिटेड, आयआरएफसी, ओरिएंटल रेल सारख्या रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांनी उत्तम परतावा दिलाय.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)