कोरोनाकाळात बंद असलेला प्रवास आता बऱ्यापैकी सुरू झाला आहे. अनेक एअरलाइन्स आणि कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. घरात बसून कंटाळलेले लोकही त्यामुळे हिरिरीने बाहेर पडायला लागले आहेत. त्यात आता सुट्यांचे दिवस असल्याने लोक सहकुटुंब प्रवासाचे प्लॅन आखताहेत. कोराेनाकाळात पर्यटन विभागाचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनीही आता वेगवेगळ्या सवलती, ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. त्यातलीच एक अफलातून ऑफर आहे, ते म्हणजे ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लेटर’! याचाच अर्थ आत्ता तुम्हाला पाहिजे तिथे प्रवास करा, पैसे नंतर, सवडीनं द्या!
व्यवस्थित नियोजन केलं तर ही ऑफर फायद्याची ठरू शकते. खिशात पुरेसे पैसे नसतानाही तुम्हाला प्रवास करता येऊ शकतो, व्यवस्थित डिल केलं, नीट चौकशी करून योग्य योजना पदरात पाडून घेतली, तर स्वस्तात प्रवास होऊ शकतो आणि हटके ठिकाणांना भेट देता येऊ शकते.
केवळ विमान कंपन्याच नाहीत, तर क्रूझ, व्हॅकेशन बिझिनेस कंपन्या.. अशा अनेकांनी ही ऑफर ग्राहकांसाठी देऊ केली आहे. मात्र याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ही जी योजना विविध कंपन्यांनी मार्केटमध्ये आणली आहे, ती म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे. आज पैसे न भरता तुम्हाला सहलीला जाता येणार असलं, तरी नंतर हप्त्यांच्या रूपात या पैशांची परतफेड तुम्हाला करावी लागणार आहे. त्यावर अर्थातच व्याज आकारलं जाईल. काही कंपन्याच्या योजना मात्र ‘इंटरेस्ट फ्री’ आहेत. म्हणजे जेवढे पैसे प्रवासासाठी तुम्ही घेतले आहेत किंवा जेवढे पैसे तुम्हाला प्रवासासाठी लागले आहेत, तेवढेच नंतर भरावे लागतील. त्यावर व्याज आकारले जाणार नाही.
‘साऊथवेस्ट एअरलाइन्स’ने हवाई बेटांवर तुम्हाला सहलीसाठी जायचे असेल, तर काही फ्लाइट्ससाठी नुकतीच ‘व्याजमुक्त’ योजना आणली आहे. काही कंपन्यांनी अल्प व्याजदर व इतरही काही सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. त्यांचा उपयोग करून आपला प्रवास सुखदायी, स्वस्त आणि आनंदी करता येऊ शकेल. अनेक कंपन्यांनी ‘प्रवास आत्ता करा, पैसे नंतर भरा’ ही योजना सुरू केली असली, तरी काहींचे व्याजदर तब्बल तीस टक्क्यांपर्यंत आहेत. शिवाय बुकिंग रद्द करता येणार नाही किंवा केलं तर त्यावर भरभक्कम दंड आकारण्याच्याही त्यांच्या अटी आहेत. त्यामुळे आधी नीट चौकशी करा आणि मगच आपल्या बॅगा भरा...