>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ब-याचदा चढउतार पाहायला मिळतात. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक आणि 16 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आधीच्या पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या सरासरी भावांच्या आधारावर दर निश्चित करतात. पेट्रोलच्या वाढत्या दरावर अनेकदा वाहनचालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह मुंबईत असलेले पेट्रोलचे दर 77 रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र पेट्रोलचा हा दर लवकरच 77 रुपयांहून खाली येणार आहे. येत्या पाच वर्षांनंतर पेट्रोलचे दर 30 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली येऊ शकतात, असा अंदाज अमेरिकेचे सिलिकन व्हॅलीचे सीरियल एन्टरप्रेनर टोनी सेबा यांनी वर्तवला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरात वाढलेले पेट्रोलचे दर कमी करता येऊ शकतात, असेही ते म्हणाले आहेत.
सेबा म्हणाले, 2030पर्यंत रस्त्यांवरील पूर्ण चित्र बदललेलं असेल. 2030 सालापर्यंत 95 सेल्फ ड्रायव्हिंग कार रस्त्यावर दिसतील. सेल्फ ड्रायव्हिंग कारमुळे इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल यांच्या किमती घट होऊन प्रतिबॅरल 25 डॉलरपर्यंत कमी होईल. येत्या 10 वर्षांत पेट्रोलची मागणी 100 मिलियन बॅरलवरून खाली येत 70 मिलियन बॅरलवर येऊन ठेपेल, असा त्यांचा अंदाज आहे.
सेबा यांनी काही वर्षांपूर्वी भविष्यात सोलार पॉवरचे रेट कमी होतील, असे भाकीत केलं होते. त्यानंतर सोलार पॉवरचे रेट जवळपास 10 पटीने कमी झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हिंदुस्थानात 2030पर्यंत सर्व इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.