Join us  

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतरही एलआयसीचा अदानी समुहावरील विश्वास कायम, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:02 AM

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यात विमा कंपनी एलआयसी (LIC) सर्वात आधी निशाण्यावर आली.

नवी दिल्ली : भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी 2023 हे वर्ष चांगले राहिले नाही. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गच्या (Hindenburg) रिपोर्टनंतर अदानी कंपनी हादरली. अदानी समूहाचे मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरच्या खाली घसरले, तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 127 बिलियन डॉलरवरून 37 बिलियन डॉलरवर घसरली. त्यामुळे अव्वल श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी खूप खाली घसरले आहेत. तसेच, गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर प्रश्न निर्माण होऊ लागले. 

हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यात विमा कंपनी एलआयसी (LIC) सर्वात आधी निशाण्यावर आली. दरम्यान, एलआयसीच्या अदानी समूहातील गुंतवणुकीवरून गदारोळ होऊनही विमा कंपनीने मोठा निर्णय घेतला. अदानींच्या कंपन्यांमध्ये एलआयसीच्या गुंतवणुकीवर बराच गदारोळ झाला, पण एलआयसीचा अदानींच्या कंपन्यांवर विश्वास अबाधित राहिला. विरोध आणि गदारोळानंतरही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने अदानीच्या चार कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी वाढवली. 

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर विरोधी पक्षांनी एलआयसीच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, संधीचा फायदा घेत एलआयसीने अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला. अदानींच्या कंपन्यांमधील हिस्सेदारी वाढवली आहे. मार्च तिमाहीत एलआयसीने अदानीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेसचे (Adani Enterprises) 3,57,500 शेअर्स खरेदी केले. विशेष बाब म्हणजे एलआयसीने ही गुंतवणूक अशा वेळी केली, जेव्हा शेअर्सच्या किमती अर्ध्याहून अधिक घसरल्या होत्या. 

या गुंतवणुकीनंतर अदानीच्या शेअर्समधील एलआयसीची हिस्सेदारी 4.26 टक्क्यांपर्यंत वाढली. डिसेंबर 2022 पर्यंत ही गुंतवणूक 4.26 टक्के होती. अदानी एंटरप्रायझेस व्यतिरिक्त आणखी तीन शेअर्समध्ये एलआयसीची गुंतवणूक वाढली आहे. एलआयसीने अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन गॅस आणि अदानी पोर्टमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. तसेच, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलआयसीने अदानींच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंट या सिमेंट कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

अदानींच्या कंपन्यांमधील गुंतवणूक वाढलीया गुंतवणुकीनंतर अदानींच्या कंपन्यांमधील एलआयसीची गुंतवणूक वाढली. अदानी एंटरप्रायझेसमधील हिस्सा 4.26 टक्क्यांवर गेला. तसेच, अदानी ट्रान्समिशनमधील हिस्सा 3.68 टक्क्यांपर्यंत वाढला. तर अदानी ग्रीनचा हिस्सा 1.28 टक्क्यांवरून 1.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन गुंतवणुकीनंतर एलआयसीने अदानी टोटलमधील आपला हिस्सा 5.96 टक्क्यांवरून 6.02 टक्क्यांवर वाढवला आहे.

टॅग्स :एलआयसीगौतम अदानीअदानीव्यवसाय