आधी हिंडेनबर्ग आणि नंतर OCCRP नं अदानी समूहाच्या कंपन्यांबद्दल नकारात्मक अहवाल जारी केला. अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर ओव्हरप्राईजींगपासून ते खात्यांमध्ये अनियमितता असे अनेक आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सचं नुकसान झालं असलं तरी, हे आरोप अदानीच्या गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत करू शकले नाहीत. कंपनीवर करण्यात आलेल्या आरोपांचं अदानी समूहाकडून खंडनही करण्यातआलं होतं.कठीण काळातही GQG सारख्या कंपन्यांनी अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली, तर आता अबुधाबीच्या आघाडीच्या इन्व्हेस्टर होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी समूहाच्या प्रमुख कंपनीत आपली भागीदारी वाढवली आहे. IHC नं अदानी एंटरप्रायझेसमधील आपली भागीदारी ५ टक्क्यांहून अधिक वाढवली आहे.आयएचसीनं अदानी एंटरप्रायझेसमधील गुंतवणूक वाढवली आहे. कंपनीनं ग्रीन एंटरप्रायझेस इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आरएससी लिमिटेड या सहाय्यक कंपनीच्या माध्यमातून अदानींच्या प्रमुख कंपनीत आपली भागीदारी वाढवली. कंपनीची अदानी एंटरप्रायझेसमध्ये आधीच ३.५३ टक्के भागीदारी होती, ती वाढवून ५ टक्क्यांहून अधिक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीनं नुकतेच अदानींच्या दोन कंपन्यांमधील आपले स्टेक विकले होते. अदानी ग्रीन आणि अदानी एनर्जीमधील गुंतवणूक त्यांनी कमी केली होती. आयएचसीनं एप्रिल २०२२ मध्ये अदानी ग्रीन एनर्जी आणि पॉवर कंपनीमध्ये प्रत्येकी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
हिंडेनबर्गनंतरही भरवसा कायम, अबुधाबीच्या गुंतवणूकदाराचा अदानींवर विश्वास; वाढवली गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 1:41 PM