Working Hours: आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी देशातील तरुणांनी दररोज सुमारे 12 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. तरुणांनी आठवड्यात किमान 70 तास काम केले पाहिजे, तेव्हाच भारत प्रगती करेल, असे ते म्हणाले होते. आता जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनीही नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
सज्जन जिंदाल म्हणाले की, आपल्याला कामाबद्दल समर्पण असले पाहिजे. आपल्याला भारताला आर्थिक महासत्ता बनवायची आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, भारताचा जीडीपी पुढील 25 वर्षांत 3.5 ट्रिलियन डॉलरवरून 35 ट्रिलियन डॉलरवर जाईल. भारत 2047 पर्यंत विकसित देश होईल.
पीएम मोदी दररोज 14-16 तास काम करतात
ते पुढे म्हणाले की, 5 दिवस काम करण्याची संस्कृती आपल्यासारख्या विकसनशील देशाला आवश्यक नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज 14-16 तास काम करतात. माझे वडील दिवसाचे 12-14 तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करायचे. मी दररोज 10-12 तास काम करतो. हा देश घडवायचा असेल, तर कामात आवड शोधावी लागेल.
आपली परिस्थिती इतर विकसित देशांपेक्षा वेगळी आहेत. ते आठवड्यातून 4-5 दिवस काम करतात, कारण त्यांच्या आधीच्या पिढीने बरेच तास काम करुन ठेवले आहे. भारताची सर्वात मोठी ताकद तरुणाई आहे. महासत्ता होण्याच्या आपल्या प्रवासात या तरुण पिढीने आरामापेक्षा कामाला प्राधान्य दिले पाहिजे. 2047 मध्ये आपल्याला अभिमान वाटेल, असे काम आपल्याला करायचे आहे, असे सज्जन जिंदाल म्हणाले.
काय म्हणाले होते नारायण मूर्ती?
नारायण मूर्ती म्हणाले होते की, आपल्याला विकसित देशांशी स्पर्धा करायची असेल, तर तरुणांना अतिरिक्त तास काम करावे लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने असेच काहीसे केले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठीही सरकारला महत्त्वाची पावले उचलावी लागतील. प्रगतीशील देशांशी स्पर्धा करायची असेल तर नोकरशाही सुधारावी लागेल. देशातील सर्व तरुणांना हे लक्षात घेऊन पुढील 20-50 वर्षे दिवसाचे 12 तास काम करावे, जेणेकरून भारत जीडीपीच्या बाबतीत नंबर 1 किंवा 2 होईल. सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, देशातील जनतेलाही पुढे येऊन योगदान द्यावे लागेल, असे ते म्हणाले होते.